चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांना अधिष्ठात्यांचे आश्वासन, कर्मचारी-अधिष्ठात्यांमध्ये बैठक,
प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांचा पदोन्नती, बिंदूनामावलीचा प्रलंबित प्रश्न सोडवावा, यासाठी सोमवारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. पण आंदोलनापुर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि कर्मचाऱयांच्या तीन संघटनांचे पदाधिकाऱयांत बैठक झाली. बैठकीत प्रलंबित मागण्या 15 दिवसांत मार्गी लावू, अशी ग्वाही राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी दिली. त्यामुळे निदर्शने, ठिय्या आंदोलन स्थगित केल्याची माहिती पदाधिकारी रमेश भोसले, संजय क्षीरसागर यांनी दिली.
राज्य सरकारी गट ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ जिल्हा शाखा, राज्य सरकारी चर्तुथ श्रेणी आरोग्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा आणि सीपीआरमधील चतुर्थ श्रेणी आरोग्य सेवा कर्मचारी संघटना यांनी सोमवारी प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता. दोन दिवस निदर्शने आणि त्यानंतर ठिय्या आंदोलनाचा इशारा संघटनांनी सीपीआर प्रशासनाला दिला होता.
संघटनांनी दिलेल्या निवेदनात वर्ग 4 ची रिक्त पदे, भरलेल्या पदांची माहिती मिळावी, भरती करताना सरळसेवा प्रक्रिया राबवावी, रिक्त पदे त्वरीत भरावीत, बिंदूनामावली अद्ययावत करावी, वर्ग 4 मधील अन्य पदोन्नती तात्काळ कराव्यात, अनुकंपाधारकांना नियुक्ती द्यावी, सेवानिवृत्तांना लाभ मिळावेत, आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू रावी, फरक मिळावा, कर्मचाऱयांसाठी कोरोना स्वतंत्र कक्ष ठेवावा, ट्रॉम सेंटरमधील 14 कर्मचाऱयांना तात्काळ नियुक्ती द्यावी, आदींचा समावेश होता.
सीपीआरमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांच्या प्रलंबित मागण्या अन् आंदोलनाची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. मस्के यांनी तात्काळ संघटनेच्या पदाधिकाऱयांची बैठक बोलावली. यावेळी झालेल्या चर्चेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांच्या प्रलंबित मागण्या 15 दिवसांमध्ये मार्गी लावू, असे लेखी आश्वासन त्यांनी दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने संघटनेने 15 दिवसाचा कालावधी प्रशासनाला द्यावा, असे आवाहन अधिष्ठात्यांनी केले. त्यामुळे संघटनांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. चर्चेत रमेश भोसले, संजय क्षीरसागर, गणेश आसगावकर, कृष्णा नाईक, जयसिंग जाधव, कांचन शिंदे, एम. बी. सिद्दीकी, विशाल कामत, चरण घावरी, रघुनाथ कोटकर, शाम परमाळ, विश्वास पाटील, राजू वालेकर, सुधीर आयरेकर आदी सहभागी झाले होते.