प्रतिनिधी / बेळगाव :
महापालिकेतील कामे रखडल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. महसूल विभागातील फाईल कित्येक महिन्यांपासून रखडल्या आहेत. त्यामुळे महसूल उपायुक्तांनी 58 वॉर्डांच्या महसूल निरीक्षकांना नेटीस बजावली असून प्रलंबित फाईली तातडीने निकालात काढण्याची सूचना केली आहे.
कोरोनाचा प्रसार वाढल्याने मागील सहा महिन्यांपासून महापालिकेचे कामकाज रखडले होते. मनपाच्या महसूल निरीक्षकांवर क्वारंटाईनची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पावसात कोसळलेल्या घरांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारीही सोपविली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली आहेत. विविध कामांकरिता नागरिकांना महापालिका कार्यालयाच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
महसूल विभागात फाईली क्षुल्लक कारणास्तव अडकल्याने नागरिकांना कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. क्वारंटाईन करण्याचे काम बंद करण्याचा आदेश शासनाने दिला असल्याने आता महसूल निरीक्षकांवरील कामाचा बोजा कमी झाला आहे. मात्र, अद्यापही नागरिकांच्या फाईली निकालात काढण्याकडे महसूल विभागाच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे फाईली निकालात काढण्याची मागणी होत आहे. याची दखल घेऊन महसूल उपायुक्तांनी सर्व महसूल निरीक्षकांना नोटीस बजावून प्रलंबित फाईली निकालात काढण्याची सूचना केली आहे. 58 वॉर्डांच्या नगरसेवकांना सूचना करून नागरिकांच्या फाईली तातडीने मुख्य कार्यालयात सादर करण्याची सूचना लेखी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे बुधवारी महापालिकेच्या महसूल विभागात महसूल निरीक्षकांची गर्दी झाली होती.