बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई शुक्रवारी प्रथमच नवी दिल्लीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. दरम्यान, ते दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची भेटघेत आहेत. त्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कर्नाटकला जीएसटीची प्रलंबित भरपाई देण्यास सहमती दर्शविली आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सांगितले.
त्यांच्या मते, सीतारामन यांनी त्यांना आश्वासन दिले की ११ हजार ८०० कोटी रुपये जीएसटी भरपाईची शिल्लक रक्कम लवकरात लवकर दिली जाईल. “मी गेल्या वर्षीची थकबाकी जीएसटी भरपाई ११ हजार ४०० कोटी रुपये भरण्याची विनंती केली आहे. एफएमने ते हप्त्यांमध्ये देण्यास सहमती दर्शवली आहे. ती लगेचच देण्यास सुरू करेल,” असे बोम्माई यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी चालू आर्थिक वर्षासाठी सुमारे १८ हजार कोटी रुपयांची जीएसटी भरपाई लवकर देण्याबरोबरच केंद्र पुरस्कृत योजनांसाठी निधीही देण्याची मागणी केली.
बोम्माई म्हणाले की, त्यांनी सीतारमण यांच्याशी राज्यातील आर्थिक परिस्थिती आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांवर चर्चा केली. केंद्रीय मंत्र्यांनी नाबार्ड अंतर्गत अधिक निधी जारी करण्याचे आश्वासन दिले, असेही ते म्हणाले.