अचूक बातमी “तरुण भारत” ची, बुधवार, 25 ऑगस्ट 2021, सकाळी 11.30
● जिल्ह्यात रूग्णवाढ व मृत्यू नोंदीत सुलभता येण्याची अपेक्षा
● ‘तरूण भारत’चा पाठपुरावा ठरला यशस्वी
● जिल्ह्यात नव्याने 635 रूग्ण बाधित
● 15339 संशयितांच्या चाचण्या
● पॉझिटीव्हीटी रेट घसरल्याने मोठा दिलासा
● 24 तासातील पॉझिटिव्हीटी रेट 4.14 वर
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात मे, जून आणि जुलै महिन्यात दैनंदिन रूग्णवाढ आणि मृत्यूसंख्या नोंदीत अनेकदा अचानक फुगवटा जाणवत होता. शासनाच्या कोरोना ऑनलाईन नोंदीच्या ऍपमधे दररोजची संख्या भरण्यास जिल्ह्यातील रूग्णालये, खासगी लॅब, आरोग्य केंद्रांकडून टाळाटाळ केली जात होती. हा प्रकार ‘तरूण भारत’ने समोर आणत रूग्णवाढीचे आकडे व मृत्यूदराचे आकडे अचानक का फुगत आहेत हे जिल्हावासियांच्या निदर्शनास आणून दिले होते. यानंतर रूग्णवाढ आणि मृत्यूसंंख्या यांच्या प्रलंबित नोंदी 24 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन भरण्याची सुचना जिल्हा आरोग्य विभागाने दिली होती. आज प्रलंबित नोंदीची ‘डेडलाईन’ संपली आहे. त्यामुळे ऑनलाईन नोंदीत सुलभता येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान बुधवारी आलेल्या अहवालात आरटीपीसीआर चाचणीत 270 रूग्ण पॉझिटिव्ह आले असून रॅपीड अँटीजन टेस्टमधे 365 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. असे गेल्या 24 तासात 635 रूग्ण पॉझिटिव्ह आले असून पॉझिटिव्हीटी रेट 4.14 वर आला आहे.
आता रूग्णवाढ, मृत्यूसंख्येचे दैनंदिन खरे आकडे अपेक्षित
कोरोना रूग्णवाढ आणि मृत्यू संख्या नोंदीत होत असलेल्या आळशीपणावर तरूण भारतने सडेतोड वृत्तांकन केले होते. या वृत्तांकनाची दखल घेऊन 10 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हा आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व शासकीय रूग्णालये, खासगी रूग्णालये, खासगी प्रयोगशाळा यांना आदेश काढत 24 ऑगस्टपर्यंत सर्व प्रलंबित नोंदी पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या होत्या. या आदेशानंतर जिल्ह्यातील यंत्रणा कामाला लागली आणि प्रलंबित नोंदी भरण्याचे काम सुरू झाले. त्यामुळेच मृत्यू दराचा आकडा दोन दिवसांपुर्वी 54 पर्यंत पोहचला. माण तालुक्यात एकाच दिवशी 19 मृत्यू दाखवले गेले. त्यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढली होती. मात्र या प्रक्रियेवर तरूण भारत सातत्याने लक्ष ठेवून नेमके आकडे वाढले कसे याची इत्यंभूत माहिती वाचकांपर्यंत पोहचवत होते.
ज्या दिवशी चाचणी त्याच दिवशी नोंद
जिल्हा आरोग्य विभागाने प्रलंबित नोंदी भरण्यासाठी 24 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीनंतर सर्व प्रलंबित नोंदी ऑनलाईन भरल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सुचना सर्व शासकीय रूग्णालये, आरोग्य केंद्रे, खासगी प्रयोगशाळांना देण्यात आले होते. आज 25 ऑगस्ट आहे आजपासून ऑनलाईन नोंदी करण्याच्या ऍपमधे बदल होणार आहे. त्यामुळे प्रलंबित नोंदी भरता येणार नाहीत. 10 ऑगस्ट रोजी काढलेल्या आदेशानुसार यापुढे ज्या दिवशी संशयितांची चाचणी होईल त्याची नोंद त्याच दिवशी होईल असे मानायला हरकत नाही. रूग्णांच्या मृत्यूचे आकडेही ऑनलाईन त्याच दिवशी भरले जातील. त्यामुळे 24 तासात कोरोना नेमका किती वाढला आणि किती कमी झाला याचे खरे आकडे समोर येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रखडलेल्या नोंदी भरल्यानेच दोन दिवसात दिलासा
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात रूग्णवाढीचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्केपेक्षा कमी आहे. 4.1 आणि 3.8 असा गेल्या दोन दिवसांचा पॉझिटिव्हीटी रेट आहे. शिवाय रूग्णवाढीपेक्षा कोरोनामुक्तीचा आकडा जास्त आहे. 24 ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालात मृत्यूसंख्या अवघी 2 वर आहे. बुधवारी नव्याने 635 रूग्ण वाढले असून पॉझिटिव्हीटी रेट 4.14 आहे. पॉझिटिव्हीटी कमी होत आहे. हा दिलासा कायम राहिल ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबरच प्रत्येक जिल्हावासियांची आहे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 16,98,400
एकूण बाधित 2,35,802
एकूण कोरोनामुक्त 2,23,533
मृत्यू 5,893
उपचारार्थ रुग्ण 1013
मंगळवारी जिल्हय़ात
बाधित 635
मुक्त 791
मृत्यू 02









