स्पेनमधील पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत मिळविले यश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो पॅरालिम्पिक्स चॅम्पियन प्रमोद भगतने स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय ग्रेड 2 स्पर्धेत तीनही कॅटेगरीमध्ये सुवर्णपदके पटकावली. स्पेनमधील व्हिटोरिया येथे ही स्पर्धा झाली.
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणाऱया सुकांत कदमने या स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावले. एकेरीत जागतिक अग्रमानांकित प्रमोद भगतने आपल्याच देशाच्या कुमार नितेशचा 17-21, 21-17, 21-17 असा पराभव करीत सुवर्ण पटकावले. एक तास ही चुरशीची लढत रंगली होती. पुरुष दुहेरीत भगत व त्याचा साथीदार मनोज सरकार यांनी आपल्याच देशाच्या सुकांत कदम व नितेश यांच्यावर 21-19, 11-21, 21-11 अशी मात करीत जेतेपद पटकावले. त्यानंतर मिश्र दुहेरीत भगतने पलक कोहलीसमवेत खेळताना अंतिम फेरीत पिछाडी भरून काढत रुतिक रघुपती व मानसी गिरिशचंद्र जोशी यांच्यावर 14-21, 21-1, 21-14 असा रोमांचक विजय मिळवित तिसरे सुवर्ण मिळविले. ‘माझ्यासाठी हे जेतेपद खास आहे. कारण दोन स्पर्धांच्या खंडानंतर मला हे यश मिळविता आले आहे. यासाठी मी कठोर मेहनत घेतली असून हे यशाचे पहिले पाऊल असल्याचे मला वाटते. आता मी पूर्णपणे ग्रेड 1 स्पर्धेवर लक्ष केंद्रित करणार असून दोनच दिवसांनी ही स्पर्धा सुरू होत आहे. येथील स्पर्धेत जे यश मिळविले, त्याची पुनरावृत्ती ग्रेड 2 मध्ये करणे मला नक्कीच आवडेल,’ अशा भावना प्रमोद भगतने व्यक्त केल्या. तो एसएल 3 क्लासिफिकेशनमध्ये खेळतो.

सुकांत कदमने जर्मनीच्या मार्सेल ऍडमचा 21-13, 21-18 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. कदमचे हे तीन स्पर्धांतील तिसरे सुवर्णपदक आहे. पुरुष दुहेरीत मात्र भगत व सरकार या अग्रमानांकित जोडीकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ‘तीन स्पर्धांतील तिसरे सुवर्ण मिळाल्याचा खूप आनंद वाटतो. आगामी स्पर्धांसाठी हे यश प्रेरणा देणारे ठरेल,’ अशा भावना सुकांतने व्यक्त केल्या. तो एसएल 4 या कॅटेगरीत खेळतो. या कॅटेगरीत एका पायाने अधू असलेले खेळाडू भाग घेऊ शकतात आणि त्यांना उभे राहूनच खेळावे लागते. त्यानेही आता ग्रेड 1 स्पर्धेवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले.









