नाशिक/प्रतिनिधी
मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महापालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत आता तीन प्रभाग पद्धत असणार आहे. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांच्या याबाबत वेगवेगळ्या भूमिका होत्या. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व महापालिकांच्या निवडणुकीत ३ सदस्यीय प्रभाग पद्धत असे असे जाहीर केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं प्रभाग रचनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत ३ सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही १ सदस्यीय पद्धत असणार आहे. महापालिकेच्या या प्रभाग रचनेवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. राज्य सरकार लोकांना गृहित धरत आहे. माझी विनंती आहे की आता लोकांनीच कोर्टात जावं, असं आवाहनच राज ठाकरे यांनी केलंय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.
‘२०१२ मध्ये जेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यापूर्वी प्रभाग नावाची काही गोष्टच नव्हती. तेव्हा सगळीकडे एकच उमेदवार होता. त्यावेळी त्यांनी दोन उमेदवाराचा एक प्रभाग अशी पद्धत सुरु केली. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळी त्यांनी ४ सदस्यीय प्रभाग केला. आता महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव दिला की परत १ सदस्यीच प्रभाग करा. निवडणूक आयोगानं राज्य सरकारला कळवलं त्यातही १ सदस्यीयच प्रभाग रचना होती. आता काल यांनी ठरवलं की ३ सदस्यीय प्रभाग करायचा. मुळात देशात अशी कुठलीही पद्धत नाही. कायद्याप्रमाणे तुम्ही पाहिलं तर देशात, कुठल्याही राज्यात अशा प्रभाग पद्धतीनं निवडणूक लढवली जात नाही. कायद्याप्रमाणे पाहिलं तर खासदार, आमदार, महापालिका अगदी ग्रामपंचायतीलाही एकच उमेदवार आहे. हे महाराष्ट्रात कुठून सुरु झालं आणि का, याचं एकमेव कारण म्हणजे सत्ता काबिज करणे’, असा घणाघात राज ठाकरे यांनी केलाय.
मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये असणार त्रिसदस्यीय प्रभाग पद्धत