आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय शक्य
विनोद सावंत/कोल्हापूर
महापालिका निवडणूकीसाठीच्या प्रभाग रचनेवरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत. काँग्रेस द्विसदस्यीय प्रभाग रचनेवर ठाम आहे. तर मागील आठवडय़ात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्रिसदस्यीय प्रभागाचा निर्णय घेतला आहे. राज्यमंत्रिमंडळाची उद्या बैठक होणार असून यात प्रभाग रचनेचा निर्णय बदलणार की त्रिसदस्यीय प्रभागच कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी राज्य शासनाकडून बहुसदस्यीय प्रभाग रचना जाहीर केली आहे. यामध्ये महापालिकेसाठी त्रिसदस्यीय आणि नगरपालिकेसाठी द्विसदस्यीय प्रभागाचा निर्णय झाला आहे. मागील आठवडय़ात झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला होता. अध्यादेशानंतर पुढील प्रक्रिया गतीमान होणार होती. एकीकडे असे असताना दुसरीकडे त्रिदस्यीय प्रभाग रचनेवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱया काँग्रेसने अक्षेप घेतला आहे. द्विसदस्यी प्रभाग रचनेवर ते ठाम आहेत. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात फेरप्रस्ताव येण्याची शक्यता आहे. त्रिदस्यीय प्रभाग रचना रद्द होऊन द्विसदस्यी प्रभाग रचना होईल, असेही काहींचे मत आहे.
इच्छुकांमध्ये घालमेल शहरातील कोरोनाची साथ नियंत्रणात आली असल्याने कोल्हापूर महापालिकेची निवडणूकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने ओबीसींचे राजकिय आरक्षणाचा अध्यादेशही काढला आहे. तसेच मागील आठवडय़ामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापालिकेच्या निवडणूकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णयही झाला. यानुसार कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होईल, असे वाटतच असताना आता पुन्हा द्विसदस्यीय प्रभाग रचनेचा विषय चर्चेत आला आहे. राजकीय पातळीवर प्रभाग रचनेबाबत सतत बदलत असणाऱया निर्णयाने इच्छुकांमध्ये घालमेल सुरू आहे.
द्विसदस्यीय प्रभाग झाल्यास
एका वॉर्डात दोन सदस्य
एकूण 45 वॉर्ड 90 सदस्य
मतदाराला दोघांना मतदान करण्याची संधी
महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्यता धुसूर
सामान्य कार्यकर्त्यांना संधी
त्रिसदस्यी प्रभाग झाल्यास
एका वॉर्डात तीन सदस्य
एकूण 30 वॉर्ड 90 सदस्य
मतदाराला तिघांना मतदान करण्याची संधी
महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्यता
सामान्य कार्यकर्त्यांची गोची
90 सदस्य फिक्स द्विसदस्यी किंवा त्रिसदस्यीय प्रभाग रचनाबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. असे असले तरी बहुसदस्यीय प्रभाग रचना असणार हे नक्की आहे. यामध्ये द्विसदस्यीय किंवा त्रिसदस्यीय या दोन्ही पैकी काहीही झाले तरी सदस्य संख्या वाढणार हे निश्चित आहे. 90 जागांसाठी निवडणूक होणार हे फिक्स असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.









