कुर्डुवाडी / प्रतिनिधी
येथील आगामी सन २०२२ ची नगरपरिषद निवडणूक प्रभाग रचना तयार करताना राजकीय हस्तक्षेप झाल्याच्या तक्रारी अर्जावर आवश्यक ती चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी सोलापुर यांना दिले आहेत.
नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी प्रस्तावित प्रभाग रचना करताना राजकीय हस्तक्षेप झाला असून प्रशासनाने राजकीय दबावाला बळी पडून चुकीची प्रभाग रचना मंजुरीसाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे प्रस्तावित केल्याबाबतची तक्रार आर.पी.आय (आ) गटाच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती.त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सदरील पत्राची दखल घेत या प्रकरणी चौकशी करणेबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांना कळवले आहे.त्यामुळे कुर्डुवाडी नगरपरिषद प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सदरची चौकशी निःपक्षपाती होन्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या महसूल विभागाकडील अधिकाऱ्याकडून करावी अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत शेंडगे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचेकडे केली आहे.