प्रतिनिधी/ पणजी
भारतीय सैनिकांना पाठिंबा देऊन त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लेह-लडाख येथे जाऊन सैनिकांची विचारपूस केली तसेच कोरोनाचे सावट असताना कोणी उपाशी राहू नये म्हणून देशातील गरीब जनतेला धान्य पुरवले. ती योजना नोव्हेंबरपर्यंत वाढवली म्हणून गोवा प्रदेश भाजपने मोदी यांचे अभिनंदन केले आहे. गोव्यातील गरीब जनतेलाही केंद्राच्या विविध योजनांचा लाभ झाल्याचा दावा भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केला आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत तानावडे म्हणाले की, मोदींच्या लेह-लडाख दौऱयामुळे तेथील सीमेवर असलेल्या भारतीय सैनिकांचे मनोबल उंचावले असून त्यांना नवीन उर्जा प्राप्त झाली आहे. मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 40 मतदारसंघातून तसेच भाजपच्या विविध मोर्चातर्फे मिळून 100 पेक्षा अधिक ऑनलाईन बैठका घेण्यात आल्या. त्यात पक्षाच्या कामाचा तसेच मतदारसंघातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला, अशी माहिती तानावडे यांनी दिली.
अन्नधान्य योजनेतून 80 कोटी जनतेला धान्य पुरवले
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नधान्य योजनेतून देशातील 80 कोटी जनतेला धान्य पुरवण्यात आले. रेशन धान्य दुकानातून ते देण्यात आले. त्यात गहू, तांदूळ, डाळ यांचा समावेश होता. रेशनकार्ड नसलेल्या परप्रांतातील कामगारांना देखील धान्य देण्यात आले व मिळाले. एप्रिल ते जून असे एकूण 3 महिने ते धान्य वितरीत करण्यात आले. ती योजना आणखी 5 महिने पुढे वाढवण्यात आली असून आता नोव्हेंबरपर्यंत धान्य मिळणार आहे, असे तानावडे म्हणाले.
एक लाख मास्कचे वितरण : खासदार तेंडुलकर
गोव्यातील सुमारे 1.42 लाख कुटुंबातील मिळून एकूण 5.44 लाख लोकांना त्या योजनेचा लाभ मिळाला. जनधन योजनेतून राज्यातील 73000 नारिकांना तीन महिने प्रत्येकी रु. 500 आर्थिक साहाय्य देण्यात आले तर किसान योजनेचा फायदा गोव्यातील 8000 शेतकऱयांना झाल्याचे त्यांनी सांगितले. खासदार निधीतून लॉकडाऊन काळात रु. 1.30 कोटी खर्च करून जनतेला आवश्यक वस्तू पुरवठा केला तर 1 लाख मास्कचे वितरण केल्याची माहिती खासदार विनय तेंडुलकर यांनी दिली.









