डेअरी व्यवस्थापक डॉ. अजित कोसंबे यांचे फळदेसाईंना रोखठोक प्रत्युत्तर, निलंबन, मेमाचे सत्र अडथळा दूर करण्याच्या दृष्टीने; आरोप सिद्ध करण्यास असमर्थ
प्रतिनिधी / फोंडा
गोवा डेअरीचे माजी अध्यक्ष राजेश फळदेसाई यांच्याविरोधात डॉ. अजित कोसंबे यांनी दाखल केलेल्या अबुनुकसानी भरपाई नोटीशीला प्रत्युत्तरादाखल कायदेशीर पुरावे सादर करण्याऐवजी त्यांनी आपल्याविरोधात बेताल व्यक्तवे करण्याचे सत्र आरंभले आहे. जर मी भ्रष्ट असेल तर लेखी पुरावे सादर करावे, अन्यथा अब्रुनुकसान भरपाई द्यावी असा इशारा व्यवस्थापक डॉ. अजित केसंबे यांनी दिला आहे. फळदेसाई यांनी चालविलेल्या या प्रकाराविरोधात अजून एक नोटीस दाखल करणार असल्याचे त्यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
गोवा डेअरीचे व्यवस्थापक डॉ. अजित कोसंबे यांनी डेअरीचे माजी अध्यक्ष राजेश फळदेसाई यांच्याविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. राजेश फळदेसाई यांनी हल्लीच एका पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. कोसंबे हे भ्रष्टाचारी असल्याचा जाहीर आरोप केला होता व सदर वृत्त पसिद्ध झाल्याने डॉ. कोसंबे यांनी फळदेसाई यांना कायदेशीर नोटीसीत रू. 5 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकून त्याला दोन दिवसात स्पष्टीकरणाचे देण्याचे सांगितले होते. त्यानंतरही राजेश फळदेसाई यांनी जाहीर व्यक्तवे करून बदनामीचे सत्र सुरूच ठेवल्यामुळेच प्रसारमाध्यमांशी स्पष्टीकरण देणे भाग पडल्याचे डॉ. कोसंबे यांनी स्पष्ट केले आहे.
2007 नंतर पशुखाद्य प्रकल्प कायम नुकसानीतच
डॉ. अजित कोसंबे यांनी दिलेल्या नोटीसीनुसार आपण गेली 30 वर्षे गोवा डेअरीत कामाला आहे व या तीस वर्षामध्ये आपल्याविरोधात एकही आर्थिक गैरव्यवहाराची व भ्रष्टाचाराची तक्रार नसल्याचे सांगितले.सन 1990 ते 2007 या काळात पशुखाद्य प्रकल्पाचा ताबा आपल्याकडे होता या काळात पशुखाद्य प्रकल्प ना नफा-ना तोटा या तत्वावर चालविण्यात यश मिळवले होते त्यानंतरच्या काळात पशुखाद्य प्रकल्प कोटय़ावधी रूपयांनी तोटा सहन करावा लागत आहे याला जबाबदार संचालक मंडळ की आणखी कोण? याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
निलंबनामागे माजी अध्यक्ष फळदेसाई व माजी एमडी नवसो सावंत
आपल्याविरोधात कित्येकवेळा निलंबन झाल्याचा फळदेसाईंच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना काणतेही कारण नसताना सन 2007 साली निलंबन केले होते मात्र यावेळी आपल्याविरोधात सबळ पुरावे एकत्रित करण्यात अपयशी आल्याने ते मागे घेतले. व डेअरीला या अधिकाऱयाची गरज नसल्याच्या कारणाने सेवेतून बडतर्फ करण्यात आले. तोपर्यंत पशुखाद्याचा ताबा एका अभियंत्याकडे दिला. परंतू त्याच संचालक मंडळाने गोवा डेअरीत एकमेव पौष्टीक आहारतज्ञ डॉ. अजित कोसंबे असल्याचे कारण सांगून परत नोकरी आपल्याला सामावून घेतले यात माझी चूक काय झाली असा सवाल डॉ. कोसंबे यांनी उपस्थित केला आहे.
दुसऱयावेळी सन 2019 साली माजी अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी स्वतः वैयक्तिक फायद्यासाठी माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसो सावंत यांच्या सहकार्याने आपल्याला निलंबित केले होते. यावेळी मी एकमेव अधिकृत उमेदवार व्यवस्थापकीय संचालकपदासाठी असल्याने ती जागा मला मिळू नये यासाठी फळदेसाई आणि डॉ. सावंत यांनी षडयंत्र रचून आपली विकेट काढल्याचा आरोप डॉ. कोसंबे यांना केला आहे. एमडी सावंत निवृत्तीच्या उंबरठयावर असताना 31/07।2019 रोजी एमडी डॉ. नवसू सावंत यांनी आपल्यानंतर डेअरीतील सर्वाधिक लायक उमेदवार डॉ. कोसंबे यांना एमडी ताबा मिळवून नये म्हणून सावंत व फळदेसाई यांनी नामी शक्कल लढविली होती. निवृत्तीच्या शेवटच्या कंत्राटी कार्यकाळात आरोपपत्र दाखल झाले असल्याने कायद्याने कोणतेही हक्क नसतानाही सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरित्या आपले निलंबन केले होते.
ई-टेंन्टरींग ऐवजी कुरीयरची निविदा का स्वीकारली ?
शंभर टन सोयाबीन एक्ट्रेक्शन खरेदी करताना सर्व निविदा ई-टेंन्डरींग माध्यमातून होत असताना कुरीयरने आलेल्या निविदेला प्राधान्य देत जर ही आर्डर घेतल्यास डेअरीला रू 11 लाखांचा नफा होणार असल्याचे सांगितल्यानंतर याला संचालक मंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे. या खरेदीत आपला कोणतेच योगदान नसल्याचे डॉ. कोसंबे यांनी सांगितले. यावेळी न्युट्रिशन तज्ञ या नात्याने आपण फक्त सरकी ही अंत्यंत कमी दर्जाची असून त्याऐवजी सोयाबीन कितीतरी पटीने योग्य असल्याचा सल्ला दिला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी रडावर असल्यामुळे फळदेसाई यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच तो लेखी उत्तरे देण्याऐवजी बेताल व्यक्तवे करीत असल्याचे कोसंबे यांनी म्हटले आहे.
आपल्यावर कायम अन्यायच, रजेचे अर्ज फाडून इन्क्रिमेंट रोखले
जेव्हा सन 2012 डॉ. नवसू सावंत यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाचा ताबा घेतला त्यावेळेपासून डॉ. कोसंबे यांचे वेतन जास्त हा प्रकार त्याला सतावत होता. यावर उपाय काढताना त्यांनी काही शुल्लक कारणावरून मेमो देण्याचे सत्र आरंभले होते. मात्र प्रत्येक वेळी सबळ पुरावे सादर न करू शकल्यामुळे हतबल बनलेली होती. डॉ. कोसंबे यांनी स्वतःवर होणाऱया अन्यायाबाबत प्रत्येकवेळी सहकार खात्याशी तसेच संचालक मंडळ, एमडीशी पत्रव्यवहार करण्यात आलेला असून कोणत्याही संचालक मंडळाने माझ्यावर होणाऱया अन्यायाची दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त केली आहे. आपल्यापेक्षा जास्त वेतन मिळत असल्याचे खुपसत असल्यामुळे डॉ. सावंत यांनी आपला दम वापरत तीनवेळा रजाअर्ज फाडून देत मुद्दामहून गैरहजर दाखवून तीन इन्क्रिमेंट रोखून आपले इप्सित साध्य केल्याचे डॉ. कोसंबे यांनी सांगितले आहे. याप्रकरणी माफिनामा, रजाअर्जाचे झेरॉक्स प्रती सर्व कागदपत्रे जोडणयात आलेली आहेत. याची सखोल चौकशी होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
राजेश फळदेसाई यांनी आपल्याविरोधात अल्कोमीटर वापरल्यानंतर माफिनामा सादर करून सेवेत रूजू केलेल्य़ा घटनेला आव्हान दिले आहे. या घटनेत आजारी रजेवर होतो, फळदेसाईने डेअरीमध्ये इनवर्ड केलेला आपला माफिनामा त्याच्याकडे असल्यास तो सादर करावा अशी मागणी केली आहे.
सद्यपरिस्थितीत माजी अध्यक्ष राजेश फळदेसाई संयम बाळगावा, बेताल आरोप करू नये. आपल्याला भ्रष्ट संबोधण्य़ापुर्वी कागदोपत्री पुरावे सादर करावे, किंवा न्यायालयामार्फत आपली बाजू मांडावी अशी विनंती व्यवस्थापक डॉ. अजित कोसंबे यांनी केली आहे. तरीही फळदेसाई यांनी आपल्याविरोधात बेताल व्यक्तवे करीत आपली प्रमिता बदनाम केलेली आहे. त्याच्यांकडे आपल्याविरोधात भ्रष्टाचाराचा पुरावा असल्यास त्यांनी तो सादर करावा अन्यथा रू. 5 कोटीची अब्रुनुकसान भरपाई द्यावी. गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांनी गोवा डेअरीमध्ये मागील आठ वर्षात रू. 14 कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याची माहिती पत्रकार परिषदेतून दिल्यानंतर चौकशीला सामोरे जावे लागणार यामुळे सर्व घोटाळेखोरांचे धाबे दणाणले आहे. डेअरीची वाटचाल योग्य दिशेने असून डेअरी बदनाम केलेल्या घोटाळेखोरांकडून सर्व रक्कम वसुल करून घ्यावी अशी मागणी डॉ. कोसंबे यांनी केली आहे.









