बेंगळूर/प्रतिनिधी
देशात सोमवारी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या टप्प्यात ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. तसंच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण केलं जात आहे.
दरम्यान काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी करोना लस प्रथम तरुणांना दिली पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. “माझं वय ७० पेक्षा जास्त आहे. तुम्ही तरुणांना करोना लस दिली पाहिजे आणि त्यांचं आयुष्य वाढवावं. माझ्याकडे जगण्यासाठी १० ते १५ वर्षच आहेत. पण तरुणांकडे मोठं आयुष्य आहे. मी देखील करोना लस घेणार आहे,” असं खर्गे यांनी एएनआयशी बोलताना म्हणाले.
लसीकरणासाठी अनेक नेते पात्र आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, व्यंकय्या नायडू यांनी पहिल्या दिवशी लसीकरण करुन घेतलं. याशिवाय ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील करोना लस घेतली.