देव तारी त्याला कोण मारी ही म्हण राजस्थानच्या जोधपूर जिल्हय़ात सत्यात उतरली आहे. ब्रिटनमधून भारतात येऊन सेवाकार्य करणाऱया एका व्यक्तीची कथा ऐकून कुणाच्याही अंगावर शहारा येईल. राजस्थानात अडकलेल्या या व्यक्तीने एकदा-दोनदा नव्हे तर तीनवेळा मृत्यूशी झुंज दिली आहे. ब्रिटिश नागरिकाला सर्वप्रथम डेंग्यू आणि हिवतापाची लागण झाली. त्यानंतर संबंधिताला कोरोनाची लागण झाली. या तिन्ही आजारांमधून बाहेर पडताच या व्यक्तीला एका विषारी सर्पाने दंश केला आहे. तरीही त्याने मृत्यूवर मात केली आहे. इयान जोन्स या व्यक्तीवर जोधपूरच्या रुग्णालयात उपचार झाले असून तो आता धोक्याबाहेर आहे.
चमत्कारच
इयान जोन्सला सर्पदंशामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्पदंशामुळे त्याची दृष्टी कमकुवत झाली होती, परंतु उपचारानंतर त्यात सुधारणा झाली आहे. दुसऱयांदा केलेल्या कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
स्थानिक कारागिरांना मदत
जोन्स हे राजस्थानच्या कारागिरांना मदत करतात. कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृतींना ते स्वतःच्या संस्थेद्वारे ब्रिटनमध्ये खरेदीदार मिळवून देतात. कारागिरांना आर्थिक संकटातून बाहेर काढणे हा त्यांचा उद्देश आहे. कोरोना संकटामुळे जोन्स ब्रिटनमध्ये परतू शकले नव्हते.









