पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरची मुक्ताफळे
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने भारताविरोधात जहरी शब्दांमध्ये गरळ ओकले आहे. आम्ही प्रथम काश्मीर ताब्यात घेऊ आणि नंतर भारतात घुसून त्याचा कब्जा घेऊ, असे त्याचे म्हणणे आहे. गझवा ए हिंद (भारताविरोधातील आक्रमण) या कार्यक्रमाचे स्पष्टीकरण देताना त्याने ही मुक्ताफळे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उधळली आहेत.
अफगाणिस्तानमधून इस्लामी दहशतवादी प्रथम काश्मीरवर आक्रमण करतील. काश्मीर ताब्यात आल्यानंतर ते भारतात घुसतील. भारतातील हिंदूंशी लढाई करून ते हिंदूंचा पराभव करतील आणि भारतात इस्लामी राज्य स्थापन करतील, असे अख्तर याचे म्हणणे आहे. यासाठी त्याने इस्लामी ऐतिहासिक साहित्याचा दाखला दिला आहे. आमच्या धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की ‘गझवा ए हिंद’ नक्कीच घडेल. केवळ अफगाणिस्तानच नव्हे, तर उझबेकिस्तान आणि इतर इस्लामी देशांमधून दहशतवाद्यांचे गट भारतावर हल्ला करतील, असे त्याने म्हटले आहे.
भारतात तीव्र प्रतिक्रिया
भारतात समाजमाध्यमांवरून याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. भारतात शोएब अख्तर याचे अनेक चाहते आहेत. त्यांना त्याच्या या भारतविरोधी विधानांमुळे धक्का बसला असून त्यांनी समाजमाध्यमांवरून अख्तर याच्यावर टीकेची झोड उठविली आहे. त्यामुळे यापुढे भारतात त्याच्या चाहत्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात घसरण्याची शक्यता आहे. ही विधाने त्याला महागात पडतील, अशी शक्यता आहे.









