निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांचा खुलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय निवड समितीने आपल्यावर अन्याय केला असेल, असे डावखुऱया सुरेश रैनाला जरुर वाटत असेल. पण, राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी रैनाला त्याच्या खराब फॉर्मचा फटका बसला असल्याचे स्पष्ट केले. रैनाने राष्ट्रीय संघात परतण्यासाठी प्रथमश्रेणी स्तरावर आपला फॉर्म सिद्ध करणे गरजेचे होते. पण, तो तसे करु शकला नाही, असे एमएसके प्रसाद येथे म्हणाले.
‘निवडकर्त्यांनी अनुभवी खेळाडूंबद्दल वेगळा विचार करणे आवश्यक होते, अशी टिपणी रैनाने अलीकडेच केली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रसाद यांनी वृत्तसंस्थेशी संपर्क साधत आपली भूमिका स्पष्ट केली.

33 वर्षीय रैनाने 226 वनडे 78 टी-20 सामने खेळले असून जुलै 2018 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या लढतीनंतर तो मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेला. त्याने गतवर्षी हॉलंडमध्ये गुडघ्याची शस्त्रक्रिया करवून घेतली असून आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळण्याच्या तो प्रतीक्षेत होता. सध्याच्या घडीला ही स्पर्धा अनिश्चित कालावधीकरिता लांबणीवर टाकली गेली आहे.
रैना व लक्ष्मण यांच्यातील फरक
एमएसके प्रसाद यांनी रैना व लक्ष्मण यांच्यातील फरक याप्रसंगी अधोरेखित केला. ते म्हणाले, ‘लक्ष्मणला 1999 मध्ये भारतीय कसोटी संघातून डच्चू मिळाला. पण, त्याने जिद्द सोडली नाही. त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 1400 पेक्षा अधिक धावांची आतषबाजी केली आणि तो पुन्हा मुख्य प्रवाहात दाखल झाला. पण, रैनाला तशी पुनरावृत्ती प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये करता आली नाही. यानंतर राष्ट्रीय संघात त्याला स्थान देण्याचा प्रश्नच नव्हता’.
रैनाने 2018-19 हंगामात 5 रणजी लढतीत 2 अर्धशतकांसह 243 धावा फटकावल्या. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विस्फोटक फलंदाजीची क्षमता असतानाही 2019 मध्ये त्याला चेन्नईतर्फे 17 सामन्यात केवळ 383 धावांवरच समाधान मानावे लागले. या खराब प्रदर्शनामुळे विश्वचषक स्पर्धेसाठीही त्याचा विचार झाला नाही.
‘दुर्दैवाने, रैनाने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये फॉर्म दाखवला नाही. दुसरीकडे, प्रथमश्रेणी क्रिकेट आणि भारत अ संघाकडून खेळत असताना युवा, नवोदित खेळाडूंनी स्वतःला सिद्ध करण्याची एकही संधी सोडली नाही. निवडकर्ते रणजी सामने पाहत नाहीत, हे त्याचे वक्तव्य तर आणखी निराशाजनक आहे. त्याने कृपया बीसीसीआयशी संपर्क साधून रेकॉर्ड तपासावेत, त्यात मागील चार वर्षात निवड समितीच्या सदस्यांनी रणजी सामने पाहण्यावर किती भर दिला, हे दिसून येईल’, असे एमएसके प्रसाद यांनी येथे स्पष्ट केले.
‘मी स्वतः रैनाशी संपर्क साधत त्याला संघातून का वगळले आणि भविष्यात त्याला नेमके कसे प्रयत्न करावे लागतील, याची स्पष्ट कल्पना दिली होती. पण, तरीही निवड समितीकडून मला काहीही सांगण्यात आले नाही, असे त्याने म्हणणे आश्चर्याचे आहे’, याचा प्रसाद यांनी पुढे उल्लेख केला. ‘रैना उत्तर प्रदेशकडून खेळत असताना मी स्वतः लखनौ व कानपूर येथे रणजीचे सामने पाहिले. आम्ही सर्व सदस्यांनी मिळून एकत्रित 200 पेक्षा अधिक रणजी सामने पाहिले आहेत’, असे ते शेवटी म्हणाले.
रैनाने मोहिंदर अमरनाथ यांच्यापासून प्रेरणा घ्यावी

‘जेव्हा वरिष्ठ संघातील एखाद्या खेळाडूला डच्चू मिळतो, त्यावेळी त्याने आपल्या खेळावर मेहनत घ्यावी, पुन्हा प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सहभागी व्हावे आणि त्या स्तरावर स्वतःला सिद्ध करत राष्ट्रीय संघाचे दरवाजे ठोठावावेत, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण, प्रथमश्रेणी स्तरावर अजिबात ठसा न उमटवता राष्ट्रीय संघात जागा मिळण्याची अपेक्षा निश्चितच गैर ठरते. रैनाने याबाबत मोहिंदर अमरनाथ यांचा आदर्श घ्यावा. आपल्या 20 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत मोहिंदर अमरनाथ किती तरी वेळा संघातून डावलले गेले. पण, त्या-त्या प्रत्येक वेळी त्यांनी जिद्दीने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये आपले नाणे खणखणीत वाजवत राष्ट्रीय संघात पुनरागमन केले होते’, असे एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले.









