शिवशक स्वराज्य दंड प्रत्येक कार्यालयात उभा करा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिले आदेश
प्रतिनिधी / सातारा
6 जून म्हणजे शिवराज्यभिषेक दिन. या दिनालाच राज्य शासनाने शिवस्वराज्य दिन असे नाव देवून यावषींपासून प्रथमच शासकीय कार्यालयात हा दिन साजरा करण्याचे परिपत्रक काढले गेले आहे. त्या परिपत्रकानुसार सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सर्व खातेप्रमुख, गटविकास अधिकाऱ्यांना शिवस्वराज्य दिन कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियम पाळून साजरा करण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यानुसार प्रथमच हा दिन जिह्यातील ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत साजरा होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलमी अत्याचारापासून यवनाच्यापासून सुटका करत रयतेचे राज्य उभे केले. किल्ले रायगडावर दि.6 जुन रोजी शिवराज्यभिषेक सोहळा झाला. तोच दिवस महाराष्ट्रात शिवभक्त, शिवप्रेमी शिवराज्यभिषेक दिन म्हणून मोठय़ा भक्तीभावाने साजरा करतात. यावर्षी मात्र शासन पातळीवर गावच्या ग्रामपंचयतीपासून ते जिल्हा परिषदेच्या कार्यालयात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्याकरता शासन पातळीवरुन तसे परिपत्रक जिल्हा परिषदेस मिळताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांना आणि जिह्यातील गटविकास अधिकाऱयांना तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिह्यातील 1496 गावांतल्या ग्रामपंचायतीमध्ये 11 पंचायत समितीत व जिल्हा परिषदेत हा दिन साजर होणार आहे.ख तशा सुचना दिल्या गेल्या आहेत.
दिन साजरा करण्यासाठी नियमावली
शिवस्वराज्य दिन साजरा करण्यासाठी नियमावली दिली गेली आहे. त्यामध्ये त्यानुसार भगवा स्वराज्यदिनासाठी ध्वज संहिता ठरवली असून ध्वज हा 3 फुट रुंद आणि 6 फुट लांब या प्रमाणात असावा, ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा. शिवशक राजदंड स्वराज्यगुढी संहिता ठरवली असून त्यामध्ये शिवशक राजदंडाचे प्रतीक म्हणून कमीत कमी 15 फुट उंचीचा वासा किंवा बांबू असावा. त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला पाच ते सहा फुटाचा आधार द्यावा, त्याकरता सुवर्ण कलश, पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षता, हळद, पुंकू, ध्वनीक्षेपक असावे. 6 जुन रोजी सकाळी 9 वाजता शिवशक राजदंडावर भगवा स्वराज्यध्वज बांधून घ्यावा, त्यावर सुवर्ण कलश बांधावा, त्यावर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी हे अष्टगंधाने लिहून त्यावर अक्षता लावाव्यात. नंतर पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी बांधावी, शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सरळ उभी करावी. तदनंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणून सांगता करावी. तसेच सुर्यस्ताला शिवशक राजदंड स्वराज्यगुढी खाली घ्यावी. भगवा स्वराज्यध्वज व्यवस्थित घडी करुन ठेवून द्यावा. हा दिवस कोरोनाचे नियम पाळून गर्दी जमणार नाही याची काळजी घेत साजरा करण्याचे आदेश दिले गेले आहेत
Previous Articleशिरोळसह परिसरात पाऊसाची हजेरी, शेतकरी वर्गात समाधान
Next Article सांगलीत पावसाची दमदार हजेरी,खरीप हंगामाची लगबग सुरु








