नजारा टेक्नॉलॉजीचा आयपीओ ः 583 कोटी रुपये उभारण्याचा अंदाज
वृत्तसंस्था / मुंबई
देशात प्रथमच एक गेमिंग कंपनी शेअर बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये नजारा टेक्नॉलॉजीचा इनीशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) खुला होणार असल्याची माहिती आहे. चालू वर्षातील हा 14 वा आणि चालू आठवडय़ातील हा चौथा आयपीओ ठरणार आहे. यासोबतच आज सुर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचाही आयपीओ सादर होणार आहे.
नजारा टेक्नॉलॉजीस आयपीओच्या आधारे 582 ते 583 कोटी रुपये उभारण्याचे संकेत आहेत. गुंतवणूकदार इश्यूमध्ये कमीत कमी एक लॉट खरेदी करु शकतो. ज्यामध्ये 13 समभाग राहणार असल्याचा अंदाज आहे. प्राईस बँड 1,100 ते 1,101 रुपये आहे. याचा अर्थ आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी 14,300 रुपयांची आवश्यकता लागणार असल्याची माहिती आहे.
ट्रेडस्विफ्ट ब्रोकिंगचे संचालक संदीप जैन यांच्या माहितीनुसार युनीक सेगमेंटनुसार गुंतवणूकदार इश्यूसाठी मोठय़ा प्रमाणात उत्साहित आहेत. याच्या अगोदर एमटीएआर टेक्नॉलॉजीचा आयपीओ 200 पट अधिक नोंदणीकृत झाल्याचे संकेत आहेत.
वाढत्या स्मार्टफोनचा लाभ
जगभरात स्मार्टफोनचा वापर वेगाने वाढत आहे. याचा फायदा हा नजारा टेक्नॉलॉजीसला होणार आहे. कंपनी देशातील टॉप ई-स्पोर्ट्स मीडिया आणि ई-गेमिंग कंपन्यांमध्ये आघाडीवर आहे. कंपनी मोबाईल गेममध्ये वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप आणि कॅरमक्लॅश, छोटा भीम, मोटू पतलू मालिका यासारख्यागेमचा समावेश राहण्याची शक्यता आहे.
60 देशांमध्ये व्यवसायाचा विस्तार
नजारा टेक्नॉलॉजीचा व्यवसाय जगातील 60 देशांमध्ये विस्तारलेला आहे. यामध्ये भारतासह आफ्रिका, मध्य पूर्व, दक्षिण पूर्व आशिया आणि लॅटिन अमेरिकन देश यांचा समावेश होणार आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये कंपनीचे उत्पन्न 46 टक्क्यांनी वधारुन 247.51 कोटी झाले आहे. तसेच आर्थिक वर्षात 2019 मध्ये नफा कमाई 556.2 टक्क्यांनी वधारुन 6.71 कोटी झाली आहे. तसेच वर्ष 2019-20 मध्ये नजारा टेकचे महिन्याच्या आधारे ग्राहक 4.01 कोटीवर राहिल्याची माहिती आहे. तर आर्थिक वर्ष डिसेंबरपर्यंत म्हणजे 9महिन्यात हा आकडा 5.75 कोटीच्या घरात पोहोचल्याची नोंद केली आहे.









