रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची घोषणा
वृत्तसंस्था / जयपूर
आगामी काळात देशातील प्रत्येक रेल्वेस्थानकावर प्लास्टिकमुक्त कुल्हडमध्येच चहा मिळणार असल्याचे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी रविवारी म्हटले आहे. देशातील सुमारे 400 रेल्वेस्थानकांवर कुल्हडमध्येच चहा मिळतो. देशातील प्रत्येक स्थानकावर ही सुविधा मिळावी अशी योजना असल्याचे गोयल म्हणाले.
प्लास्टिकमुक्त भारतात रेल्वेचेही योगदान असणार आहे. कुल्हडमुळे लाखो बंधू-भगिनींना रोजगार मिळतो. पूर्वीच्या काळात रेल्वेस्थानकांवर कुल्हडमध्येच चहा मिळायचा. परंतु प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे कुल्हड गायब झाले आहेत. परंतु खादी ग्रामोद्योग विभागाच्या मदतीने रेल्वेने कुल्हडचा वापर वाढविण्याची मोहीम चालविली असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.
रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण
2009 ते 2014 दरम्यान राजस्थानात रेल्वेचे शून्य विद्युतीकरण झाले होते. तर 2014 नंतर 1433 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. रेवाडी ते अजमेर या रेल्वेमार्गावर आता सर्व रेल्वे विद्युतीकरणानेच कार्यान्वित होणार आहेत. डिझेलसंचालित रेल्वे बंद करून क्षेत्रातील प्रदूषण पूर्णपणे रोखू. विद्युतीकरणामुळे रेल्वेचा वेग वाढणार असून उद्योग, शेतकऱयांच्या उत्पादनांना लवकरच बाजारपेठ मिळणार असल्याचे गोयल म्हणाले.
किसान रेलने होणार लाभ
किसान रेल शेतकऱयांचे पीक देशाच्या कानाकोपऱयापर्यंत पोहोचविणार आहे. यातून शेतकऱयांना योग्य भाव मिळणार आहे. रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणामुळे मालगाडय़ांचा वाहतूक खर्च कमी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाचा लाभ देशाच्या कानाकोपऱयातील व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे गोयल यांनी नमूद केले आहे.









