उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा
प्रतिनिधी / कोल्हापूर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य आणि कार्याची प्रेरणा आणि ऊर्जा युवापिढीला मिळावी या व्यापक उद्देशाने राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात दरवर्षी स्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी कोल्हापुरात केली. या संदर्भात येत्या आठ दिवसांत उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या वतीने शासकीय आदेश जारी केला जाईल, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
येथील सायबर कॉलेजमधील रूसा अंतर्गत डेटा सेंटर आणि सी. बी. एस. ई. राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. सर्व जाती-धर्मातील मावळयांना बरोबर घेवून स्वराज्याच्या रक्षणासाठी लढा दिला. शेती, विविध व्यवसाय, व्यापार, उदीम, संरक्षण यासह राजकारण, समाजकारण, युद्धनीती आदी विविध क्षेत्रात त्यांनी केलेले नियोजन, व्यवस्थापन, घेतलेले निर्णय यांची माहिती आजच्या युवा पिढीला मिळावी, या व्यापक हेतूने स्वराज्य दिन महाविद्यालयात साजरा करण्यासंदर्भात विचार झाला. आता तो प्रत्यक्षात आणण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या आठ दिवसांत शासकीय आदेशही काढला जाईल.
उर्वरीत प्रश्न सोडवण्याचा युध्द पातळीवर प्रयत्न
`उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या दारी’ हा उपक्रम जाहीर झाल्यानंतर कोल्हापूर विभागीय सहसंचालक कार्यालयातील 3635 प्रलंबित प्रकरणापैकी 3034 प्रकरणे मार्गी लागली. या उपक्रमासाठी शिवाजी विद्यापीठाचा एक नवा पैसाही मी खर्च केलेला नाही. प्राध्यापक, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होते ते सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. एखाद्या कर्मचाऱयांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांपुढे संसाराचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न निर्माण झाला होता. मृत 7 कर्मचाऱयांच्या मुलांना ऑन दी स्पॉट अनुकंपाखालील नोकरीची ऑर्डर दिली. त्यामुळे विरोधक सोशल मिडीयाच्या माध्यमातून माझ्यावर काय टीका करतात याकडे मी लक्ष देत नाही, असा टोलाही मंत्री सामंत यांनी भाजपचे नाव न घेता लगावला.