पंतप्रधान मोदींची घोषणा, विनामूल्य उपलब्धतेचे संकेत, अर्थव्यवस्थाही लवकरच पूर्वपदावर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाची लस उपलब्ध होताच, ती सर्व भारतीय नागरिकांना देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. कोणीही लसीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता आपले सरकार घेईल, असे महत्वपूर्ण व्यक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते एका प्रसिद्ध वृत्तसमूहाला मुलाखत देत होते. देशाची अर्थव्यवस्थाही आता झपाटय़ाने सुधारत असून अपेक्षेपेक्षा कमी वेळात ती पूर्वपदावर येईल, असा विश्वासही त्यांनी या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.
आम्ही कोरोना लस उपलब्ध होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. ज्या क्षणी ती उपलब्ध होईल, तेव्हापासूनच विनाविलंब ती नागरिकांना देण्यास प्रारंभ करण्यात येईल. प्रारंभी समाजाचा जो वर्ग वंचित आणि कोरोनाबाधाप्रवण अशा स्वरूपाचा आहे, त्या वर्गातील नागरिकांना लस देण्यात प्राधान्य देण्यात येईल. तथापि, तेवढय़ावरच आम्ही थांबणार नाही. प्रत्येक नागरिकाला लसीचा लाभ मिळेल. तेव्हढी सज्जता केली जाईल व दक्षता घेतली जाईल, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
विनामूल्य मिळेल ?
लसीकरणाचा कार्यक्रम देशभर प्राधान्याने क्रियान्वित केला जाईल, या पंतप्रधान मोदींच्या विधानात ही लस गरजवंतांना विनामूल्य उपलब्ध केली जाईल, याचा संकेत मिळत आहे. तसे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले नसले तरी तशी मागणी होत आहे. केवळ पैशाअभावी नागरिकांना लसीपासून वंचित न ठेवण्याचे उत्तरदायित्व सरकारचे आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल नागरिकांना तरी ही लस विनामूल्य मिळेल असे स्पष्ट निर्देश त्यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत.
आधीच सज्जता
लस उपलब्ध होताच तिचे उत्पादन आणि वितरण वेगाने करता यावे यासाठी सरकारने आधीपासूनच सज्जता ठेवली आहे, असाही संकेत त्यांनी दिला. सरकारने याकामी पुढची पावले उचलण्यासाठी राष्ट्रीय तज्ञ गटाची स्थापना करण्यात आली आहे. लसीचा साठा करण्यासाठी 28 हजार केंद्रे स्थापन करण्यात येत आहे. याच केंद्रांमधून लसीचे संबंधित भागांमध्ये वितरणही करण्यात येईल. यामुळे देशाच्या प्रत्येक कानाकोपऱयात लस पोहचविणे शक्य होईल. राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर त्यासाठी विशेष समर्पित दले स्थापन करण्याच्या दिशेने वेगाने हालचाली होत आहेत. लसवितरण पद्धतशीरपणे होईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
भारतात 2 लसींवर काम
कोरोना लसीवर अद्याप काम आणि परीक्षणे सुरू आहेत, हेही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. भारतात 2 लसी प्रगतीपथावर आहेत. एक लस भारत बायोटेक तर दुसरी झायडस कॅडिला कंपनी विकसीत करत आहे. या लसींची वैद्यकीय परीक्षणे सुरू आहेत. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेका लसीवर भारतात परिक्षणे सुरू आहेत. या लसी लवकरात लवकर उपलब्ध होतील अशी आशा आहे.
अर्थव्यवस्था घेतेय वेग
कोरोना काळात देशाला अनेक दिवस लॉकडाऊनमध्ये रहावे लागले. हा निर्णय कटू तरी अत्यावश्यक होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली पण असंख्यांचे जीव वाचले. लॉकडाऊन केला नसता, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. त्यामुळे तो निर्णय योग्यच होता. आता अर्थव्यवस्था गती घेत आहे. मागणी वाढली आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीत नोंदणी केलेल्या कामगारांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. याचाच अर्थ नवे रोजगार निर्माण होत आहेत. उत्पादन वाढत आहे. त्यामुळे लवकरच अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊन पुढे वेगाने वाटचाल करेल, असे आश्वासक वक्तव्यही पंतप्रधान मोदींनी मुलाखतीत केले. वस्तू-सेवा कराच्या वाटणीसंदर्भात राज्य सरकारांशी असलेले वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व मुख्यमंत्र्यांशी आपली चर्चा झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.









