खंडाळा / प्रतिनिधी :
पुण्यातील भिडेवाडय़ात पाच मजली सावित्रीबाई फुलेची शाळा उभी करण्यासाठी प्रयत्न सुरु असून, अगामी काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सावित्रीबाई फुले वसतिगृह स्थापन करणार असल्याची घोषणा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नायगाव येथे बोलताना केली.
खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे स्त्री शिक्षणाच्या जनक जानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 191 व्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले, बहुजन समाजाला मार्गदर्शन करून समान हक्क मिळवून देण्याचे काम फुले दाम्पत्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजातील घटकांना मतदानाचा हक्क मिळवून दिला. छत्रपती शाहु महाराजांनी दलितांना प्रथम आरक्षण दिले. त्यांचा कित्ता गिरवित डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारतात दलित शोषितांना त्यांचे हक्क मिळवून दिले. आजही काही जणांना फुलेंची ऍलर्जी आहे. अथर्व वेद वाचण्याचा हक्क माहिलांना सावित्रीबाई फुलेंमुळे मिळाला हे विसरून चालणार नाही. कर्मकांड करणे किंवा इतर कामे करणे हा संबंधिताचा धंदा आहे. हे महात्मा फुले यांनी सांगितले होते. आपण त्यांना विसरून चालणार नाही.
महाज्योती या संस्थेच्या ताब्यात येथील पर्यटन केंद्र देऊन नायगांवच्या विकासासाठी प्रयत्न करु. ओबीसी आरक्षणासंदर्भात आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओरीसा या राज्यात निवडणूकांमध्ये आरक्षण स्थगिती मिळाली आहे . इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरु आहे. ओबीसी समाज म्हणजे खाली बसलेला हत्ती आहे. त्याला कितीही टोचले तरी उठत नाही, असे उत्तर प्रदेशचे नेते काशीराम म्हणत असत. या समाजाला अनेक सुविधा हव्या आहेत. मात्र, यासाठी संघर्ष करायला हा समाज पुढे येताना दिसत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.









