अध्याय अठ्ठाविसावा
कोणत्याही परिस्थितीत भगवंतांचा सहवास सोडायला तयार नसलेल्या उद्धवाला भगवंत त्यांच्या सर्वव्यापी निर्गुण स्वरुपाची ओळख करून देणार आहेत. त्यामुळे उद्धव त्यांच्या निर्गुण स्वरूपावर प्रेम करू लागेल आणि मग सगुण रुपातले भगवंत निजधामाला गेले तरी उद्धव त्यांचा विरह सहन करू शकेल असा भगवंतांचा त्यामागे उद्देश आहे. तो कुठेही गेला तरी निर्गुण अवस्थेत भगवंत सदैव त्याच्या बरोबर असतील असा विश्वास त्याला वाटू लागेल. निर्गुण परब्रह्म हे नि:शब्द असते पण भगवंत सगुण रुपात असल्याने ते नि:शब्दाचा सोलीव शब्द सांगणार आहेत. उद्धवाच्या हितासाठी ते विशुद्ध ज्ञान सांगत आहेत. ह्या विश्वाची निर्मिती मायेपासून झाली आहे आणि माया म्हंटली की तिच्यासोबत त्रिगुणांचा उल्लेख हवाच. हे लक्षात घेऊन निरुपणाच्या सुरवातीला भगवंत त्रिगुणांच्याबद्दल सांगत आहेत. ते म्हणाले, संसारात सत्व, रज आणि तम असे मुख्य तीन गुण आहेत. त्यामुळे माणसेही तीन प्रकारची आहेत तशीच त्यांची कर्मेही तीन प्रकारची असतात. शांत, दारूण आणि मिश्र असे कर्मांचे तीन प्रकार आहेत. उद्धवा आता पहिली गोष्ट लक्षात घे ती अशी की, वर मी सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या कर्मांची निंदा किंवा स्तुती करू नये. कारण एकाचे कौतुक केले की, इतर दोघांना गौण लेखल्यासारखे आपोआपच होते. शरीराचा डावा किंवा उजवा भाग हे एकाच देहाचे अंग असते. त्याप्रमाणे हे जग जरी प्रकृती आणि पुरुष यातून तयार झालेले असले तरी ते चिद्रूप असलेल्या परमेश्वराचाच भाग आहे आणि जे परमेश्वराचाच भाग आहे ते निश्चितच सर्वोत्तम असल्याने त्यात कुणाची निंदा करणार आणि स्तुती तरी कोणाची करणार? तेव्हा कुणाची निंदाही करू नये तसेच कुणाची स्तुतीही करू नये. प्रत्येक भुताचे ठायी ईश्वरी स्वरूप असलेला आत्मा एकच असतो. तेव्हा कुणाची स्तुती किंवा निंदा करण्यात काहीच अर्थ नाही. तेव्हा उद्धवा परमार्थात काही प्रगती करायची असेल आणि त्यातून स्वत:चा उद्धार करून घ्यायचा असेल तर कुणाचीही निंदा किंवा स्तुती करण्याचे बिलकुल सोडून दे. असे करू शकलास तरच सर्वाभूती भगवद्भाव तू पाहू शकशील कारण सर्वाभूती ब्रह्मस्थिती अनुभवण्यात, हा चांगला, तो वाईट असा फरक करून त्यांची निंदा स्तुती करण्याचा माणसाचा स्वभाव हाच मोठा अडथळा आहे. बरं चांगले वाईट मनुष्य कसे ठरवतो तर जो त्याच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी उपयोगी पडतो तो चांगला आणि जो त्याला त्याकामी मदत करत नाही तो त्याच्या दृष्टीने वाईट ठरतो. म्हणून जर सर्व इच्छा सोडून निस्पृह झालास तर लोकांची निंदा स्तुती करून परमार्थ मार्गातून विचलित करणारा अडथळा तू पार करू शकशील. असे झाले तर तुला ब्राम्हस्थिती अनुभवण्यात कोणतेच विघ्न येणार नाही. दुसरे विशेष म्हणजे अमुक एक चांगला आणि अमुक एक वाईट हे ठरवणारा मनुष्य स्वत:ला ज्ञानी समजत असतो. वास्तविक पाहता आपल्याला सगळं कळतंय ह्या गैरसमजापोटी तो स्वत:च्या आयुष्याची माती करून घेत असतो. स्वत:ला ज्ञानी समजून उठसूट जगाचे गुणदोष लोक पहात असतात. खरं बघितलं तर प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार कर्म करत असतो पण ही गोष्ट लक्षात न घेता स्वत:ला ज्ञानी आणि शहाणा समजणारा मनुष्य त्याला नावे ठेवत असतो. प्रत्यक्षात असं आढळून येतं की, जो तो ज्याच्या त्याच्या स्वभावधर्मानुसार वागत असतो. उदाहरणार्थ हनुमंत परमज्ञानी होता पण त्याच्या स्वभावानुसार मर्कट चाळे करण्यात तसूभरही कमी नव्हता. नारदमुनीही ज्ञानी आणि सर्वश्रेष्ठ होते पण त्यांच्या स्वभावानुसार कळ लाऊन भांडणे लावण्याची त्यांना आवड होती. गरुड तर प्रत्यक्ष श्रीविष्णूंचे वाहन म्हणून दारात हात जोडून प्रभूंच्या आज्ञेची वाट पहात तिष्ठत उभा असतो पण तोही स्वभावाप्रमाणे साप दिसला की त्याला खाण्यास मागेपुढे पहात नाही.
क्रमश: