तवांगमधील झटापटीची पार्श्वभूमी ः राफेल अन् सुखोई युद्धाभ्यासात सामील
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीनंतर उद्भवलेल्या स्थितीदरम्यान भारतीय वायुदलाने अरुणाचल प्रदेश समवेत ईशान्येतील भागात गुरुवारी दोन दिवसांचा मोठा युद्धाभ्यास सुरू केला आहे. या युद्धाभ्यासात अत्याधुनिक लढाऊ विमान राफेल आणि सुखोई समवेत वायुदलाच्या जवळपास सर्व प्रंटलाइन लढाऊ विमाने सामील झाली आहेत.
पीएलएसोबत झटापट झाल्यावर निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीदरम्यान युद्धाभ्यासाच्या पहिल्या दिवशी अरुणाचल प्रदेशातील एलएसीच्या नजीकच्या भागातून पूर्ण ईशान्य क्षेत्राला क्यापत स्वतःच्या युद्धक्षमतेला वायुदलाने पडताळून पाहिले आहे. हा युद्धाभ्यास कुठल्याही प्रकारे तवांग सेक्टरमध्ये घडलेल्या घटनेशी निगडित नसल्याचे वायुदलाने स्पष्ट केले होते.
या युद्धाभ्यासाची योजना पूर्वीच आखण्यात आली होती. तवांग क्षेत्रात अलिकडेच घडलेल्या घटनेशी याचे कुठलेच देणेघेणे नाही. वायुदलाच्या उड्डाण पथकाच्या प्रशिक्षणाची निरंतरता कायम राखणे हा युद्धाभ्यासाचा उद्देश आहे. सर्व प्रंटलाइन लढाऊ विमानांसह ग्राउंडशी निगडित अनेक प्रकारच्या सैन्यसामग्रीलाही युद्धाभ्यासात सामील करण्यात आल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले.
वायुदलाने वाढविली सतर्कता
कुठल्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी वायुदलाची सज्जता पडताळून पाहणे हे या युद्धाभ्यासाचे लक्ष्य आहे. राफेल आणि सुखोईसह सर्व प्रंटलाइनर लढाऊ विमाने शुक्रवारीही स्वतःचा युद्धाभ्यास सुरू ठेवणार आहेत. तवांगमधील एलएसीवर झालेल्या झटापटीनंतर वायुदलाने स्वतःची सतर्कता पूर्वीपेक्षा अधिक वाढविली असून अरुणाचलच्या भागात हवाईगस्त घातली जात आहे.
चिनी सैनिकांना पिटाळून लावले
तवांगमध्ये 9 डिसेंबर रोजी झालेल्या झटापटीदरम्यान चीनने ड्रोनसमवेत काही हवाई प्लॅटफॉर्म्सना तैनात करत यांग्त्से क्षेत्रातील जैसे थे स्थिती एकतर्फी स्वरुपात बदलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दक्ष भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना तेथून पिटाळून लावले होते.









