2 लाख 66 हजाराची फसवणूक : मार्केट पोलिसात गुन्हा दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
प्रतिष्ठित इंग्रजी माध्यम शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे सांगून पालकांकडून रक्कम उकळणाऱया दोघा जणांविरुद्ध येथील मार्केट पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळा प्रवेशासाठी करण्यात आलेल्या या आर्थिक ‘व्यवहारा’ने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.
कलईगार गल्ली येथील शबाना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीहर्षा व स्नेहल दोघेही मूळचे राहणार जयनगर-बेंगळूर, सध्या रा. पाटील गल्ली या दोघा जणांवर भादंवि 406, 420 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर पुढील तपास करीत आहेत.
श्रीहर्षा व स्नेहल हय़ा सध्या पाटील गल्ली परिसरात किंडरगार्टन चालवतात. या शाळेत शिकणाऱया दोन मुलांना प्रतिष्ठित इंग्रजी माध्यम शाळेत पहिलीत प्रवेश मिळवून देण्याचे सांगून पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रवेशासाठी फोन पे च्या माध्यमातून एकूण 2 लाख 66 हजार रुपये ट्रान्स्फर करून घेण्यात आले आहेत.
9 फेब्रुवारी 2022 ते 10 मार्च 2022 या वेळेत एकदा 1 लाख 28 हजार आणखी एकदा 1 लाख 38 हजार रक्कम जमा करून घेण्यात आली आहे. इतकी मोठी रक्कम घेऊनही प्रवेश तर नाहीच, घेतलेले पैसेही परत केले नाहीत म्हणून पालकांनी पोलिसात धाव घेतली आहे. मार्केट पोलीस पुढील तपास करीत आहेत.









