प्रतिनिधी/ मडगाव
प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो व अन्य महिला कार्यकर्त्यानी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयावर पेट्रोल व डिझेल दर वाढीचा निषेध करताना तिरडी रॅली काढला होती. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करून अंजुना-बार्देश येथील अंकित साळगांवकर यांनी पोलीस तक्रार नोंद केली होती.
या तक्रारीला अनुसरून पोलिसांनी प्रतिमा कुतिन्हो यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या 295ए आणि 298 कलमा खाली गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अशा पद्धतीने पोलीस तक्रारी करून आपला आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी आपण गप्प बसणार नाही. अन्यायाविरूद्ध आपला लढा या पुढे ही कायम चालू राहणार असल्याचे प्रतिमा कुतिन्हो यांनी म्हटले आहे.
आपल्या विरोधात पोलीस तक्रार करणारी व्यक्ती ही ‘आरएसएस’चा कार्य करता असून आपण अशा गोष्टींना महत्व देत नाही. यापूर्वीही आपला आवाज बंद करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण, आपण जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरत आहे. आज पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे व तेच सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आपण दुचाकीची तिरडी रॅली काढली होती. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.









