देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 81 वर, 9 राज्यांमधील शाळा-महाविद्यालये बंद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या शुक्रवारी 81 झाली. यामध्ये 64 भारतीय तर 17 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर 9 राज्यांमधील शाळा व महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बहुतांश राज्यांमधील सार्वजनिक कार्यक्रमावरही बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली व हरियाणा सरकारने कोरोनाची ‘महासाथ’ असल्याचे जाहीर केले तर ओडिशाने राज्यातील आपत्ती असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोरोनाचा फटका बसलेल्या इराणमधून 44 भारतीयांना शुक्रवारी मुंबईत आणण्यात आले. या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिल्ली, उत्तराखंड, ओडिशा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, मणिपूर, पंजाब, छत्तीसगड राज्यांमधील शाळा, चित्रपटगृहे व सार्वजनिक ठिकाणी होणारे कार्यक्रम 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, दक्षिण कोरिया आणि श्रीलंकेला होणारी सर्व उड्डाणे 30 एप्रिलपर्यंत रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी एअर इंडियाने घेतला आहे. इराणमध्ये अद्याप सहा हजार भारतीय अडकले असून, त्यांना मायदेश आणण्यासाठी विमान पाठवले जाईल. तसेच इटलीतील मिलनामध्ये अडकलेल्या 220 भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विमान पाठवले जाईल, असे नागरिक उड्डाण मंत्रालयाच्या सचिव रुबिना अली यांनी सांगितले.
सार्क देशांनी रणनीती आखावी : पंतप्रधान
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याबाबत आपण चर्चा करू शकतो. सार्क देशांनी कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी रणनीती आखावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. दरम्यान, भारत आणि बांगलादेशमधील बस आणि रेल्वेसेवा 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे गृह मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी सांगितले.









