मेढा / प्रतिनिधी :
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जावली तालुक्यातील प्रतिपंढरपूर करहर येथील श्री विठ्ठलाची आषाढी यात्रा यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे.
मागील काही दिवसातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वच नियोजित यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने जावली तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करहर मध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. मात्र कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा हे मंदिर भाविकांसाठी बंद राहणार असून, यात्रेनिमित्त 19 तारखेच्या सायंकाळी 6 वाजलेपासून ते 20 तारखेच्या रात्रीपर्यंत विठ्ठल मंदिर करहर व त्याभोवतालच्या 100 मीटरच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच यात्रेदिवशी कुडाळ, करहर, आनेवाडी या महसूल मंडळातून मानाच्या पालख्या करहर मध्ये दाखल होतात. त्यामुळे करहर, कुडाळ महसूल मंडळ आणि आनेवाडी मंडळातील आनेवाडी या गावांत सुद्धा संचारबंदीचे आदेश जावलीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारान्वये काढले आहेत.









