विविध कंपन्यांची नवनवीन उत्पादने कोरोना काळात बाजारात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या महामारीच्या काळात देशातील पॅकेज्ड गुड्स कंपन्यांनी विविध उत्पादने सादर केली आहेत. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत या कंपन्यांनी नवनवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. यामध्ये इतर उत्पादनांसह प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करणाऱया उत्पादनांचा समावेश केला आहे. कोविडच्या संकट काळात ग्राहकांकडून सदरच्या उत्पादनांना मोठय़ा प्रमाणात मागणी वाढल्याचे पहावयास मिळाले आहे.
पॅकेज्ड फूड क्षेत्रातील देशातील तिसऱया नंबरची सूचीबद्ध कंपनी आयटीसीने मागील पाच महिन्यात 40 नवीन उत्पादने सादर केली आहेत. यामध्ये भाज्या आणि अन्य उत्पादनांचा समावेश आहे. मागील संपूर्ण वर्षात कंपनीने एकूण 60 नवीन उत्पादने सादर केली आहेत.
विप्रोने एप्रिल 2020 पासून नवीन उत्पादने सादर केली आहेत. यामध्ये साबण, हॅण्डवॉश, सॅनिटायझर, डिसइन्फेक्टंट्ससह अन्य उत्पादने बाजारात उतरविली असल्याची माहिती विप्रो कंझुमर केअर ऍण्ड लायटिंगचे अध्यक्ष अनिल चुग यांनी सांगितले आहे.
हळद उत्पादनात तेजी
हळदीसंदर्भात आयुष मंत्रालयाने सादर केलेल्या नियमावलीनंतर याच्याशी संबंधीत असणाऱया उत्पादनांना मोठय़ा प्रमाणात बाजारात आणण्यात येत आहे. यामध्ये अमूलने हळदीचे आइसस्क्रीम आणि हळद दूध बाजारात आणले आहे. डाबरने महामारीच्या काळात तीन महिन्यात 40 पेक्षा अधिक नवीन उत्पादने बाजारात उतरवली असल्याचे डाबरचे सीईओ मोहित मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे.









