आठ जणांवर गुन्हा दाखल
पुलाची शिरोली /वार्ताहर
स्मशानभूमीस विरोध करणाऱ्यांच्या निषेधार्थ तिरडी मोर्चा काढून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत असताना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्या प्रकरणी टोप ता. हातकणंगले येथील आठ जणांवर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये शिवराज शिक्षण संस्था अध्यक्ष, शिपाई यांचा समावेश आहे. हि घटना रविवारी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालय व स्मशानभूमीत घडली होती.
एम. टी. उर्फ महादेव तुकाराम पाटील, गणेश महादेव पाटील, दौलत महादेव पाटील, क्रष्णराव बाबुराव पाटील, प्रभाकर संदीपान निंबाळकर, जगन्नाथ बाबु कांबळे, बाजीराव यशवंत तावडे सर्व राहणार टोप व शिपाई रविंद्र रामचंद्र वडर रा. तळसंदे ता. हातकणंगले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टोप येथे गट नंबर १८५ मध्ये १९७६ पासुन स्मशानभूमी आहे. येथे गावातील मयत व्यक्तींचे अंत्यसंस्कार केले जातात. हि स्मशानभूमी कायमस्वरूपी बंद करावी. म्हणून महादेव पाटील हे हरकत घेत असतात. त्यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते दिलीप गणपती पाटील यांनी शासकीय परवानगी घेऊन तिरडी मोर्चा काढला होता. व प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत असताना दहनाचा कार्यक्रम करू नका अन्यथा जिवंत सोडणार नाही. अशी धमकी दिली व सर्व आरोपींनी एक जमाव करुन फिर्यादी व मोर्चातील लोकांच्यावर धावून गेले. व त्यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. या कारणांमुळे दिलीप पाटील यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे करीत आहेत.