सातारा / प्रतिनिधी:
मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याने प्रतापसिंहनगर येथील मेकॅनिकल कॉलनी परिसरात विद्युत वाहक तार तुटली होती. त्या तारेचा शॉक आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास बळी गंगाराम खुडे यांच्या तीन म्हैशी आणि एका कुत्र्याला बसला. त्यात त्यांचा तडफडून क्षणात मृत्यू झाल्याची घटना घडली. सुदैवाने म्हैस मालक बचावला. घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याने तणाव निवळला रिपाईसह विविध संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मंगळवारी सायंकाळी सातारालगतच्या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात खेड ते कोरेगाव जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या मेकॅनिकल कॉलनीच्या शेजारील विधुत वाहक तार तुटली. त्याची माहिती देण्यासाठी स्थानिकांनी महावितरण कार्यालयात फोन ही केल्याचे सांगण्यात येते. बुधवारी सकाळी 11.30वाजण्याच्या सुमारास प्रतापसिंहनगर येथील बळी गंगाराम खुडे यांच्या मालकीच्या तीन म्हैशी चारायला घेऊन निघाले होते तोच पडलेल्या तारेचा विद्युत झटका बसताच तिन्ही म्हैशी आणि कुत्रे तडफडून मृत्यू झाल्याचे डोळ्यादेखत घटना घडली. सुदैवाने म्हैशी चारायला घेऊन जाणाऱ्यास काही झाले नाही.म्हैशी मृत झाल्याने कुटूंबियांना समजताच दुःखाचा डोंगर कोसळला. पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
रिपाइंसह अनेकांनी दिला आंदोलनाचा इशारा
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे तीन म्हशी मृत्यू पावल्या. एकंदर हे सर्व एम ए सीबी च्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या व अधिकार यांच्या हलगर्जीपणामुळे झाले आहे. यामध्ये एका शेतकऱ्याचे चांगले नुकसान झाले असून महावितरण कंपनीने पिडीतास तातडीची मदत जाहीर करावी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर बेफिकरपणा बाबत कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपाई ब्ल्यू फोर्स पक्षाच्यावतीने करत महावितरण कार्यालयाच्यासमोर आंदोलन करण्यात येईल,असा इशारा रिपाईचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल कांबळे यांनी ही त्या शेतकऱ्यास तातडीने मदत करावी अशी मागणी केलेली आहे.









