प्रतिनिधी / बेंगळूर
विधानपरिषदेत मंगळवारी घडलेल्या नाटय़मय घडामोडींमुळे संसदीय व्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला. दरम्यान, सभापती प्रतापचंद्र शेट्टी यांनी राजीनामा देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसचे सदस्य असणाऱया प्रतापचंद्र शेट्टी यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय भाजपने घेतला असून त्याला निजदने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शेट्टी यांना सभापतीपदाचा राजीनामा द्यावा लागण्याची अनिवार्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
सभापती प्रतापचंद्र शेट्टी यांनी राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखविली आहे. परंतु, विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी त्यांना पुढे घडणाऱया घडामोडींची प्रतीक्षा करा. त्यानंतरच राजीनामा देता येईल, असा सल्ला दिला आहे.
मंगळवारी प्रतापचंद्र शेट्टी यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यासाठी सत्ताधारी भाजपने विधानपरिषदेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले होते. मात्र, सभापतींनी सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, अशी तक्रार भाजप आणि निजद नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे. दरम्यान, राज्यपालांनी या तक्रारीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया वा निर्देश दिलेले नाहीत. राज्यपालांकडून निर्देश आल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय घ्या, असा सल्ला काँग्रेस नेत्यांनी प्रतापचंद्र शेट्टी यांना दिला आहे.
कायदेशीर लढा देणार
विधानपरिषद सभागृहात मंगळवारी घडलेल्या घडामोडी आणि सभापतीपदाचा अवमान होईल अशा रितीने भाजप आणि निजदच्या काही सदस्यांनी वर्तन केले आहे. याबाबत कायदेशीर लढा उभारण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. भाजप-निजद सदस्यांचे वर्तन सभागृहाच्या नियमांच्या विरुद्ध आहे. याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करून सभापतीपद आपल्या पक्षाकडे राखून ठेवण्याची धडपड काँग्रेसने चालविली आहे.
राज्यपालांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रीत
विधानपरिषदेत मंगळवारी सदस्यांमध्ये झालेली झटापट, धक्काबुक्की, गदारोळासंदर्भात राज्यपाल वजुभाई वाला यांनी सभागृहाच्या संबंधित अधिकाऱयांकडून अहवाल मागविला आहे. कायदेतज्ञांशी चर्चा करून सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव आणि सभागृहाचे कामकाज सुरू ठेवण्याबाबत राज्यपाल सूचना देण्याची शक्यता आहे.
सभागृहात भीती निर्माण झाल्याने कामकाज तहकूब केले!
विधानपरिषद कामकाजावेळी सभागृहात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळेच आपण सभागृहाचे कामकाज अनिश्चित कालावधीसाठी तहकूब केले, असे सभापती प्रतापचंद्र शेट्टी यांनी सांगितले आहे. त्यांनी राज्यपालांना लेखी स्वरुपात यासंबंधीचा अहवाल पाठविला असून सरकारच्या विनंतीनुसार आपण मंगळवारी एक दिवसाचे अधिवेशन बोलावले होते. सकाळी 11.15 वाजता सभागृहाच्या सचिवांना बेल मारण्याची सूचना देण्यात आली. आपण कार्यालयात बसलेलो असतानाच सचिवांना कोरमची बेल वाजवली. बेल बंद होण्याआधीच उपसभापती धर्मेगौडा सभागृहातील आपल्या आसनावर बसले. आपण सूचना दिलेली नसताना देखील धर्मेगौडा आपल्या स्थानावर स्थानापन्न झाले. त्यामुळे सभागृहात गदारोळ माजला. त्यामुळे आपल्याला सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले, असे समर्थन प्रतापचंद्र शेट्टी यांनी केले आहे.









