- पोलीस ठाण्यात जमा केली मूर्ती
ऑनलाईन टीम / प्रतापगड :
उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील एका गावात कोरोना मातेचे मंदिर बनवले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, प्रशासनाने हे मंदिर हटविले असून पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतले असून घटनेची तपासणी सुरु केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुकुलपूर जुही या गावात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि दहशत सुरू झाली. दरम्यान, गावातील लोकेश श्रीवास्तव या इसमाने 7 जून रोजी कोरोना मातेचे मंदिर बनविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने एक मूर्ती ऑर्डर केली आणि गावातील एका चौथऱ्याजवळील लिंबाच्या झाडाच्या बाजूला स्थापन केली.
लोकांनी अंधश्रद्धा बाढवा देत या देवीची पूजा आरती सुरू केली. याची माहिती पोलिसांना कळल्यावर लोकेश श्रीवास्तव घाबरला. ही बाब अंधश्रद्धेशी जोडली असल्याने हे मंदिर पडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानंतर सांगीपुर पोलिसांनी शुक्रवारी रात्री जेसीबीने मंदिर हटविले.
दरम्यान, आरोपीच्या एका भावाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. मंदिर जमीनदोस्त करण्यात आल्याने गावात चर्चांना उधाण आले आहे.