अमेरिकेत भारतीय स्वातंत्र्याचा जल्लोष
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारताच्या स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनी पहिल्यांदाच यंदा 15 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरवर भारतीय तिरंगा फडकविला जाणार आहे. तर तेथील ऐतिहासिक वारसास्थळांमध्ये सामील एम्पायर स्टेट इमारतीला तिरंग्याच्या तीन रंगांनी उजळविले जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन द फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन (एफआयए) करणार आहे. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून भारतीय विदेश सेवेचे अधिकारी रणधीर जायस्वाल उपस्थित राहणार आहेत.
एफआयए अमेरिकेत राहणाऱया भारतीयांची सर्वात जुनी आणि सर्वात मोठी संघटना आहे. 1970 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. या संघटनेचे हे 50 वे वर्ष असून ते संस्मरणीय ठरावे याकरता हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
भारतीय दूतावासाचा सहभाग
न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे हे कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात आयोजित होणार असून त्यांचे थेट प्रसारण केले जाणार आहे.









