प्रतिनिधी / सातारा :
शहरातील 40 वॉर्डात गल्लोगल्ली स्ट्रीट लाईट आहेत. या स्ट्रीट लाईट दुरुस्ती देखभालीचे काम सांगलीच्या प्रज्वल भारत या कंपनीकडे आहे. या कंपनीला सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये केलेल्या कामाचा मोबदला पालिकेच्यावतीने योग्य वेळेत देण्यात आला. परंतु पुन्हा सातारा पालिकेकडून ठेकेदाराची गळचेपी करण्याचे काम सुरु झाले. त्यामुळे गेल्या दोन वर्षामध्ये बील न देण्याचे प्रकार रखडवलेले असून सुमारे 75 लाख रुपयांचे बील पालिकेने थकवले गेल्याचे समजते. दरम्यान, बील थकवले गेल्याने शहरात बहुतांशी ठिकाणी अंधार दिसत आहे. गतवर्षीचे केवळ पंधरा लाखाचे बील कसेबसे दिले गेले असल्याचे समजते.
सातारा पालिकेकडून नेहमीप्रमाणे कोणताही बाहेरचा ठेकेदार असो, त्याची चांगली जिरवायची अन् आपल्याला हवे तसे काम करवून घ्यायचे आणि पैसेही द्यायचे नाहीत. हा अनुभव कचरा गोळा करण्याचे टेंडर घेणाऱ्या साशा या कंपनीला आला होता. साशा या कंपनीने मधूनच पळ काढल्यावर त्या कंपनीच्या नावाखाली अनेकांनी मलिदा हाणला. शहरात स्ट्रीट लाईट देखभाल दुरुस्तीचे काम पहाणाऱ्या प्रज्वल भारतलाही याचा अनुभव आला. एकूण चार बिले त्यांच्या कामाची थकवली गेली आहेत. तब्बल 72 लाख रुपयांचे ही बिले असून त्या अगोदरचे बील हे 15 लाख रुपयांचे दिले गेले आहे. बील थकवले गेल्याने या कंपनीकडून सध्या स्ट्रीट लाईटच्या दुरुस्तीचे काम सध्या होताना दिसत नाही. त्यामुळे अंधारात शहरवासीय चाचपडत आहेत.









