नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
भारतीय वायुदलात अलिकडेच सामील करण्यात आलेले चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टर पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या वेळी फ्लाय पास्टमध्ये सामील होणार आहेत. चिनूक हे वाहतूक हेलिकॉप्टर असून 350 किलोमीटर प्ा्रखतितासापेक्षा अधिक वेगाने उड्डाण करणारे अपाचे हे लढाऊ हेलिकॉप्टर आहे.
3 चिनूक ‘विक’ फॉर्मेशनमध्ये उड्डाण करतील. फ्लायपास्टमध्ये त्यानंतर अपाचे हेलिकॉप्टर सामील असतील. 5 अपाचे ‘एअरोहेड’ फॉर्मेशनमध्ये उड्डाण करणार असल्याची माहिती वायुदलाच्या वरिष्ठ अधिकाऱयाने सोमवारी दिली आहे.
फ्लायपास्टमध्ये 45 विमाने
फ्लायपास्टमध्ये वायुदलाची 41 विमाने आणि सैन्य एव्हिएशन विंगची 4 हेलिकॉप्टर्स सामील असतील. 16 लढाऊ विमाने, 10 वाहतूक विमाने आणि 19 हेलिकॉप्टर्सचा यात समावेश असेल आणि फ्लायपास्ट दोन टप्प्यांमध्ये पार पडणार असल्याची माहिती अधिकाऱयाने दिली आहे. प्रजासत्ताक दिन संचलनाचे नेतृत्व करताना सर्वप्रथम एमआय-15 आणि व्ही-5 हेलिकॉप्टर ‘वाय’ फॉर्मेशनमध्ये उड्डाण करणार आहेत. तसेच याला वाईन ग्लास फॉर्मेशन असेही म्हटले जाते. सैन्याच्या एव्हिएशन विंगची 4 हेलिकॉप्टर्स ‘ध्रूव’ फॉर्मेशनमध्ये उड्डाण करणार आहेत.
सुखोईचा समावेश
फ्लाय पास्टचा दुसरा हिस्सा राजपथावरील संचलनानंतर सुरू होणार आहे. यात सर्वप्रथम वायुदलाची 3 एमके-5 डब्ल्यूएसआय हेलिकॉप्टर ‘विक’ फॉर्मेशनमध्ये उड्डाण करणार आहेत. त्यानंतर 3 चिनूक हेलिकॉप्टर्सही ‘विक’ फॉर्मेशनमध्ये झेपावतील. अखेरीस 3 सी-130जे सुपर हर्क्यूलिस फ्लाय पास्ट करतील. दोन सुखोई-30 एमकेआय ‘नेत्र’ फॉर्मेशनमध्ये, 3 सी-17 ग्लोबमास्टर ‘ग्लोब’ फॉर्मेशनमध्ये उड्डाण करणार आहेत.
मिग-29 झेपावणार
फ्लाय पास्टमध्ये 5 जग्वार, 5 मिग-29 विमाने देखील झेपावतील. जोधपूर वायुतळावरून 3 सुखोई ‘त्रिशूल’ फॉर्मेशनमध्ये उडणार आहेत आणि अखेरीस सुखोई ‘व्हर्टिकल चार्ली’ फॉर्मेशनमध्ये राष्ट्रपती भवनाच्या दिशेकडून इंडिया गेटच्या दिशेने उड्डाण करणार आहेत. हे उड्डाण जमिनीपासून 60 ते 300 मीटर उंचीवरील असणार आहे.
विंग कमांडर गोयलांकडे नेतृत्व
प्रजासत्ताक दिन संचलनाचे नेतृत्व विंग कमांडर विपुल गोयल करणार आहेत. वायुदलाचे प्रवक्ते ग्रूप कॅप्टन अनुपम बॅनर्जी यांनी सोमवारी ही माहिती दिली आहे. विंग कमांडर विपुल गोयल तिन्ही संरक्षण दले आणि निमलष्करी दलांच्या आंतर सेवा गार्डचे नेतृत्व करणार आहेत. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा राजपथावर राष्ट्रीय ध्वज फडकविण्यासह सुरू होणार आहे. वायुदल या कार्यक्रमाचे संयोजक असल्याने मुख्य व्यासपीठावर ध्वज फडकविताना फ्लाइंग ऑफिसर अमन हे उपस्थित राहतील. कठोर निर्धारित प्रक्रियेच्या अंतर्गत संचलनात सामील होणाऱया वायुसैनिकांची निवड करण्यात आल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले आहे.