ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथांनी नेहमीच छाप पाडली आहे. मात्र, यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱया संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही.
प्रजासत्ताक दिनी होणाऱया संचलनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. महाराष्ट्राने यावर्षीच्या संचलनासाठी मराठी रंगभूमीची 175 वर्षे या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र तो नाकारला गेला आहे.
दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर दिमाखदार सोहळा पार पडतो. या सोहळय़ामध्ये भारताची संरक्षण दले शस्त्रास्त्रांसह शक्तिप्रदर्शन करतात. तसेच विविध राज्यांचे चित्ररथ संचलनामध्ये सहभाग घेत आपापल्या राज्याच्या सांस्कृतिक वैशिष्टय़ांचे प्रदर्शन घडवत असतात. मात्र यावर्षी चित्ररथाचा प्रस्ताव नाकारला गेल्याने प्रजासत्ताक दिनातील संचनात महाराष्ट्र दिसणार नाही.
दरम्यान, महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगालचा चित्ररथाचा प्रस्तावही नाकारला गेला आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱया संचलनात एकूण 22 चित्ररथ सहभागी होणार आहेत.









