ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 71 व्या प्रजासत्ताक दिनी 48 वर्षांची परंपरा मोडीत काढत एक नवी सुरुवात केली आहे. राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यास जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी हुतात्म्यांना अभिवादनासाठी इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती या स्मारकाच्या ठिकाणी गेले नाहीत, तर त्यांनी नव्यानेच उभारलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सीडीएस यांच्यासह तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते.
दरम्यान, प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनी तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख अमर जवान ज्योती स्मारक येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहतात. १९७१ च्या भारत-पाक युद्धातील शहिदांच्या स्मरणार्थ १९७२ साली इंडिया गेट येथे अमर जवान ज्योती हे स्मारक उभारण्यात आले होते. यावेळी प्रथमच पंतप्रधानांनी नव्याने उभारलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक स्थळी जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली. विशेष म्हणजे यावेळी प्रजासत्ताक दिन समारंभात देशाचे पहिले सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत सहभागी झाले.
इंडिया गेटपासून जवळच 44 एकरांवर पसरलेले राष्ट्रीय युद्ध स्मारक आहे. अमर चक्र, शौर्य चक्र, संन्यास चक्र आणि रक्षक चक्र अशा चार स्तंभांनी हे बनलेले आहे. यावर 25 हजार 942 जवानांची नावे ग्रॅनाइट टॅब्लेटवर सोन्याच्या अक्षरांनी लिहिलेली आहेत. पंतप्रधानांनी मागील वर्षी 25 फेब्रुवारी रोजी देशाचे 44 एकर युद्ध स्मारक देशाला समर्पित केले होते