रॅली, सभांवर 11 फेब्रुवारीपर्यंत बंदी : निवडणूक आयोगाकडून आदेश जारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनारुग्णांची संख्या लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका होणार असलेल्या पाच राज्यांमध्ये प्रचारसभा आणि रोड शोवर असलेली बंदी 11 फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवली आहे. मात्र, निर्बंध काही अंशी शिथिल केल्यामुळे आता प्रचाराला बहर येऊ शकतो. आता घरोघरी प्रचारासाठी 20 जणांना निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. तसेच सभागृहातील बैठकीला पाचशे आणि खुल्या मैदानातील सभेला एक हजार लोकांच्या उपस्थितीला अनुमती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने सर्व पक्ष आणि उमेदवारांना व्हर्च्युअल माध्यमातून प्रचारावर भर देण्याची सूचनाही केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी केंद्रीय आरोग्य सचिवांची भेट घेऊन रॅलींवरील बंदीचा आढावा घेतला. देशातील कोरोनारुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने उमेदवारांना थोडा दिलासा दिला आहे. जाहीर प्रचारसभांना एक हजार लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. तर खुल्या मैदानात 50 टक्के क्षमतेसह उपस्थितीला परवानगी दिली आहे. तसेच इनडोअरसाठी 500 जणांसह बैठकीला परवानगी दिली आहे. ही संख्या पूर्वी 300 होती. तर घरोघरी प्रचारासाठी आता दहाऐवजी 20 जणांना परवानगी दिली आहे.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने प्रथम 15 जानेवारीपर्यंत निर्बंध घातले होते. त्यानंतर कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता निवडणूक आयोगाने 22 जानेवारीपर्यंत पाच राज्यांमध्ये रॅली आणि रोड शोवर बंदी घातली होती. मात्र, त्यानंतर ती वाढवून 31 जानेवारी करण्यात आली. तसेच घरोघरी प्रचारासाठी फक्त पाच ते दहा जणांनाच परवानगी दिली होती. आता यापुढेही बंदी कायम असली तरी काही प्रमाणात सूट जाहीर करण्यात आली आहे. 11 फेब्रुवारीला पुन्हा एकदा कोरोनास्थितीचा आढावा घेऊन निवडणूक आयोग रॅली आणि रोड शोबाबत निर्णय घेणार आहे.
10 फेब्रुवारीपासून 7 टप्प्यात निवडणुका, 10 मार्चला निकाल
जानेवारी महिन्याच्या प्रारंभी पाच राज्यांमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. उत्तर प्रदेशमध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत 7 टप्प्यात. 14 फेब्रुवारी रोजी उत्तराखंड आणि गोव्यात एकाचवेळी मतदान होणार आहे. पंजाबमध्येही 20 फेबुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला दोन टप्प्यात मतदान असेल. सर्वत्र निकाल एकाच तारखेला म्हणजेच 10 मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे.









