२५ एकर शेतीमध्ये ५० खंडी भात पिकवण्याचा उच्चांक
प्रतिनिधी / खेड
कोरोनाच्या संकटांवर मात करून तालुक्यातील कुडोशी येथील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी भात पिकाचा कोकणात विक्रम करत आपल्या २५ एकर शेतीत जवळपास ५० खंडी भाताचे उत्पादन घेऊन उच्चांक निर्माण केला आहे. त्यांचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.
प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी मुंबई सारख्या महानगरात हॅथवे साईस्टार केबल नेटवर्क सारखे भव्य जाळे निर्माण करून संपूर्ण मुंबई महानगरात एक चांगला उद्योजक म्हणून नावलौकिक निर्माण करताना शेकडो मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यानंतर पुणे, औरंगाबाद, नांदेड सह उर्वरित महाराष्ट्राबरोबर कोकणातही आपल्या केबल नेटवर्क द्वारे, सर्वच ठिकाणी केबल इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पर्यटक कोकणात यावेत त्यांची त्याच पद्धतीने व्यवस्था व्हावी या दृष्टिकोनातून खेड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी या ठिकाणी पंचतारांकित हॉटेलच्या उभारणीचे फार मोठे योगदान कदम यांनी दिले असून संपूर्ण कोकणात सर्वच क्षेत्रातील पर्यटकांना चांगल्या दर्जाची हॉटेल सुविधाही निर्माण केली आहे.
कोकणातील शेती ही अत्यंत खर्चिक व शेतीसाठी माणसे न मिळत नसल्याने कोकणातील शेतकरी, शेतीकडे दुर्लक्ष करीत असताना गेल्या ५ वर्षांपासून सदानंद कदम हे कोकणात वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या शेती उत्पादनाचे उच्चांक निर्माण करून स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत आहे. २०२० हे वर्ष तसा देश विदेशातील अनेक संकटामुळे आर्थिकही अडचणींचा ठरला. मात्र, सदानंद कदम अग्रेसर ठरत त्यांनी कुडोशी व वेरळ येथील शेतात जवळपास २५ ते ३० एकर शेतीमध्ये ५० खंडी भाताचे उत्पादन घेऊन कोकणातील इतक्या मोठ्या प्रमाणात भात उत्पादन करणारा एकमेव शेतकरी म्हणून विक्रम केला आहे.









