प्रतिनिधी / मडगाव
गोव्याचे प्रख्यात वास्तुविशारद सार्तो आल्मेदा यांचे काल वयाच्या 96 वर्षी काल बुधवारी निधन झाले. दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. गोव्यातील पर्यावरणीय नियंत्रण समिती व संवर्धन समितीचे ते सदस्यही होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी श्रीमती तेरेझ आल्मेदा असा परिवार आहे.
सार्तो आल्मेदा यांना हिंदू संस्कृतीचा अभ्यास होता. पर्तगाळ येथील मठाचा आराखडा त्यांनी तयार केला होता. मडगावच्या आना फोंन्त गार्डनचे ते शिल्पकार होते. तसेच नुवे येथील कार्मेल कॉलेज त्याच वाणिज्य, धार्मिक, संस्थात्मक आणि जीर्णोद्धार कामातही त्यांनी योगदान दिली होते.
विरोधीपक्ष नेत्यांना दुख
विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत यांनी वास्तुविशारद सार्तो आल्मेदा यांच्या निधनावर तीव्र दुख व्यक्य केले आहे. त्यांच्या कुटुंबियाबद्दल शोक व्यक्त करताना, त्याच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली आहे.
1924 साली जन्म झालेल्या सार्तो आल्मेदा यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर मुंबईतच ते आर्किटेक्चर म्हणून थोडय़ा कालावधीसाठी कार्यरत राहिले व नंतर अहमदाबादला गेले. जेथे त्यांनी 1964 पर्यंत बी. व्ही. दोशी बरोबर काम केले. त्यानंतर त्यांनी गोव्यात येऊन 1967 मध्ये स्वतःचे कार्यालय स्थापन केले. गोव्याची वारसा स्थळे जपण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड असायची. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ते कटिबद्ध होते.









