हरिद्वार / वृत्तसंस्था
हरिद्वार येथे धर्म संसदेमध्ये द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी आतापर्यंत दुसरी अटक करण्यात आली आहे. यती नरसिंहानंद गिरी यांना शनिवारी रात्री पोलिसांनी अटक केली. धर्म संसदेतील मुस्लिमांविरुद्धच्या प्रक्षोभक भाषणांमुळे हे प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे. द्वेषयुक्त भाषण करणाऱयांवर कारवाई करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जुना आखाडय़ाचे महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. तत्पूर्वी गुरुवारी याच प्रकरणात वसीम रिझवी उर्फ जितेंद्र नारायण त्यागी याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते. वसीम रिझवीच्या सुटकेच्या मागणीसाठी यती नरसिंहानंद सर्वानंद घाटावर उपोषण करत होते. याप्रकरणी संतांनी शुक्रवारी सर्वानंद घाटावर निषेध सभाही आयोजित केली होती.









