चंदीगड / वृत्तसंस्था
पंजाबचे माजी मुख्यमंत्री 93 वर्षीय प्रकाशसिंह बादल यांची प्रकृती सातत्याने बिघडत चालली आहे. त्यांना चंदीगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्रीपासून ते आजारी असल्याचे सांगण्यात आले.
शिरोमणी अकाली दलाचे अनेक नेते त्यांची विचारपूस करण्यासाठी लंबी आणि चंदीगडमध्ये पोहोचत आहेत. प्रकाशसिंह बादल हे लंबी विधानसभा मतदारसंघातील अकाली दलाचे उमेदवार आहेत. त्यांची या मतदारसंघातील ही पाचवी निवडणूक असून ते मागील काही काळापासून प्रचार देखील करत होते.
प्रकाशसिंह बादल हे काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित आढळून आले होते. सुमारे 5 दिवसांपर्यंत त्यांच्यावर लुधियाना येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. तेथे प्रकृती सुधारल्यावर ते लंबी येथे गेले होते आणि पुन्हा प्रचारास प्रारंभ केला होता. बादल यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु राजकारणात सक्रीय राहण्याची त्यांची इच्छा असून ते निवडणूक लढवत आहेत.









