ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्याचा प्रथम नागरिक म्हणून विविध व्यासपीठावरुन वावरत असतांना पुण्याचे महापाैर म्हणून विषेश मान सन्मान मिळत असतो. पुण्याचे नावलाैकिक होण्यात अनेक घटकांचा हातभार असतांना पुण्यातील लेखकांचे विचार संपुर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर पोहचविण्यात पुण्यातील प्रकाशकांनी मोलाची भूमिका निभावलेली आहे. महराष्ट्राचे बाैद्धिक आणि वैचारीक भरण-पोषण करण्यात प्रकाशकांची भूमिका मोलाची आहे, असे मत पुण्याचे महापाैर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
येथील दिलीपराज प्रकाशनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे उद्घाटन आणि सुवर्ण महोत्सवी बोधचिन्हाचे अनावरण आज महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी दिलीपराज प्रकाशनातर्फे पुणे महानगरपालिकेच्या जंबो कोविड सेंटरला एक लाख रूपये किंमतीची पुस्तके देणगी रूपात भेट देण्यात आली.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, भारतातील इतर राज्यांची महाराष्ट्राशी तुलना केली असता महाराष्ट्र तसे शांतताप्रिय राज्य असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. महाराष्ट्राला वैचारिक लढ्याची पार्श्वभुमी लाभलेली असून महाराष्ट्राचा वैचारिक पाया पक्का आणि भक्कम करण्यात प्रकाशक सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. पुण्याने संपूर्ण महाराष्ट्राला अनेक नामवंत लेखक , विचारवंत दिले. त्यांचे माैलिक विचार आणि शब्दसुमने प्रकाशकांनी त्यांच्या वितरणव्यवस्थेच्या यंत्रणेद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविले.
महाराष्ट्र सहिष्णुबनविण्यात प्रकाशकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हातभारच लावला आहे. आजही करोना सारख्या महामारीशी लढा देत असतांना अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना पुढे आल्या. त्यांच्यामुळेचप्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी झाला. संकट काळात सर्वांची एकत्रीत ताकद करोना सारख्या महामारीला देखील पळवून लावेल यात शंका नाही. या संकट काळात पुणेकरांनी जपलेलेसामाजिक भान पाहिले की आपण या पुण्यनगरीचे महापाैर आहोत या अभिमानाने ऊर भरून येतो. दिलीपराज प्रकाशनाने देखील त्यांची सामाजिक बांधिलकी पाळत साधेपणाने कार्यक्रम घेत कोरोना ग्रस्तांसाठी एक लाखांची पुस्तके भेट दिली, हे कौतुकास्पद आहे.