कनेडी / वार्ताहर
नरडवे महंमदवाडी धरणातील प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेवूनच आतापर्यंत प्रकल्पाचे काम करण्यात आले. जोपर्यंत सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत नरडवे धरणाची घळभरणी केली जाणार नाही, प्रकल्पग्रस्तांनी गैरसमज करुन घेवू नये. प्रकल्पग्रस्तांना देण्यासाठी गावठाणांमध्ये भूखंड तयार असून त्याठिकाणी मुलभूत सुविधांही आहेत. जो पर्यंत प्रकल्पग्रस्त भूखंड ताब्यात घेत नाहीत तो पर्यंत त्या सुविधाचा वापर सुरु होणार नाही. पर्यायी शेतजमीनींच्या पॅकेज अंतर्गत विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्तांना प्रती हेक्टरी 50 लाख देण्यास नियामक प्राधिकरणाने मंजूरी दिली आहे. तरी प्रकल्पग्रस्तांनी धरणाच्या कामाला सहकार्य करावे असे आवाहन पाटबंधारे विभागाचे सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता विजय थोरात यांनी केले.
नरडवे धरणाचे काम गुरुवारी प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले होते. त्यानंतर प्रकल्पग्रस्त आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक शुक्रवारी सायंकाळी धरणाच्या नरडवे येथील कॅम्पवर आयोजीत करण्यात आली होती. मात्र या बैठकीला प्रकल्पग्रस्त उपस्थित राहिले नाहीत. बैठकीसाठी अधीक्षक अभियंता विजय थोरात, कार्यकारी अभियंता महादेव कदम व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.









