बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना केंद्र सरकारतर्फे विविध स्वरुपात मदत करण्यात येत आहे. यामध्ये विविध योजनांचा लाभ घेणाऱया लाभार्थींच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापैकी असंख्य पेन्शनधारक पोस्ट कार्यालयांतून आपली पेन्शनची रक्कम घेत असतात. मात्र कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दि. 26 मार्चपासून पोस्ट कार्यालये बंद करण्यात आली होती. शुक्रवार दि. 3 रोजी ही कार्यालये सुरू करताच पेन्शन घेण्यासाठी पेन्शनधारकांनी पोस्ट कार्यालयांसमोर रांग लावली होती.
संध्या सुरक्षा, वृद्धाप वेतन, विधवा वेतन अशा पेन्शनधारकांची पेन्शन जमा झाली आहे. मात्र गेल्या 26 मार्चपासून पोस्ट कार्यालये बंद असल्याने या पेन्शनधारकांची परवड चालली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे या मंडळींची फारच अडचण झाली आहे. यामुळे पेन्शन तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. याची दखल घेऊन शुक्रवारपासून पोस्ट कार्यालये सुरू केली आहेत. याची माहिती मिळताच पेन्शन घेण्यासाठी कार्यालयासमोर गर्दी जमू लागली. भारतनगर-वडगाव येथील पोस्ट कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळपासूनच मोठी रांग लागली होती. सध्या कोरोनामुळे सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याची दखल घेत पोस्ट मास्टर सय्यद यांनी स्वत: पुढाकार घेऊन पेन्शनधारकांना सुरक्षित अंतर ठेवण्याचे सांगितले. तसेच पेन्शन देण्यासाठी दोन काऊंटरची व्यवस्था आणि विशेष कुपन देण्याची व्यवस्था केली. यामुळे पेन्शनधारकांना लवकरात लवकर पेन्शन देण्याचे काम सुरू आहे.
या भागातील गरीब, गरजू, वृद्ध, दिव्यांग मंडळी पेन्शनधारक आहेत. सध्या त्यांची परिस्थिती बिकट बनली आहे. तर सुमारे आठवडाभर पोस्ट कार्यालये बंद ठेवण्यात आल्याने त्यांची परवड होत होती. यामुळे लवकरात लवकर त्यांना पेन्शन देऊन सहकार्य करण्याचे काम पोस्ट खात्याच्यावतीने होत आहे. मात्र पेन्शनधारकांनीही थोडा संयम बाळगावा. तसेच शिस्तीने आणि सुरक्षित अंतर ठेवूनच पेन्शन घेणे गरजेचे बनले आहे.
सध्या घरपोच पेन्शन पोहोचविण्याची व्यवस्था करण्याची मागणी
दरम्यान पेन्शनसाठी वाढत असणारी गर्दी लक्षात घेऊन पेन्शनधारकांना ठराविक कुपन देण्यात आले आहेत. यामुळे पेन्शन देणे सोपे होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या ऐवजी पोस्ट खात्याच्यावतीने संबंधित पेन्शनधारकांना सध्या घरपोच पेन्शन पोहोचविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.









