प्रकाश नाचणेकर/ राजापूर :
राजापूर तालुक्यातील नाणार सब पोस्ट कार्यालयाचे पोस्टमास्तर संदीप प्रभूदेसाई यांनी तब्बल 155 आंबापेटय़ा पोस्टामार्फत वाशी मार्केटला पाठवण्याचा अभिनव प्रयोग केला आहे. पोस्ट खात्याच्या इतिहासात अशा प्रकारे प्रथमच पोस्टामार्फत आंबा पाठवण्यात आला असून यामुळे आंबा बागायतदारांना एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. आंबा वाहतुकीतून पोस्ट खात्यालाही चांगले उत्पन्न मिळवणे शक्य होणार आहे.
देशभरात कोरोना विषाणूचा कहर सुरू असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व वाहतूक ठप्प असल्याचा सर्वात जास्त फटका सध्या आंबा व्यावसायिकांना बसत आहे. कोणातील अर्थव्यवस्था ज्या आंबा पिकावर अवलंबून आहे, अशा कोकणच्या हापूस आंब्याचा हंगाम सुरू असताना लॉकडाऊनमुळे आंबा मोठमोठय़ा मार्केटमध्ये पाठवणे सध्या बागायतदारांसाठी अडचणीचे ठरत आहे. स्थानिक बाजारपेठा बंद असतानाच मोठय़ा मार्केटमध्ये अथवा प्रक्रिया उद्योगांपर्यंत आंबा पोहोचवताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत. अशातच पोस्ट खात्याने आंबा वाहतुकीसाठी पुढाकार घेत आंबा व्यावसायिकांना दिलासा दिला आहे.
राजापूर तालुक्यातील नाणार सबडीव्हीजन पोस्ट कार्यालयाचे पोस्टमास्तर म्हणून काम पाहणाऱया संदीप प्रभूदेसाई यांनी मुंबईहून पोस्टाचे टपाल घेऊन येणाऱया व्हॅनमधून आंबा मुंबईतील वाशी मार्केटला पाठवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी टपाल खात्याची रितसर परवानगी घेत मुंबईहून टपाल घेऊन आलेल्या गाडीतून सुमारे 155 पेटय़ा वाशी मार्केटला पाठवल्या आहेत. टपाल खात्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे टपाल गाडीतून आंबा वाहतूक करण्यात आली आहे.
दरम्यान आता आंबा वाहतुकीची ही सेवा लॉकडाऊन संपेपर्यंत अशीच सुरू राहणार आहे. यासाठी खासगी वाहतुकीएवढेच भाडे आकारण्यात येत आहे. पोस्ट खात्याने कोकणातील आंबा मुंबईपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतल्याने कोकणातील आंबा बागयतदारांना दिलासा मिळाला आहे. शिवाय आंबा वाहतुकीच्या भाडय़ापोटी टपाल खात्यालाही चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळाले आहे. या पहिल्याच वाहतुकीतून पोस्ट खात्याला 22,500 रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
पोस्टाच्या इतिहासात प्रथम आंब्याची वाहतुक करण्याचा मान मिळवून देणारे नाणार सबडीव्हीजनचे पोस्टमास्तर प्रभूदेसाई यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कामी रत्नागिरी पोस्ट कार्यालयातील अधिकारी, राजापूर पोस्टमास्तर रामचंद्र कुलकर्णी तसेच नाणार सबडीव्हीजनेचे एबीपीएम शैलेश मांडवे, विनय अमृते यांचे सहकार्य लाभल्याचे प्रभूदेसाई यांनी सांगितले.









