घातलेले पेव्हर्सही निखळले : कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे कॅम्प येथील पोस्टमन सर्कल सध्या समस्यांनी वेढले आहे. मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी खड्डे पडले असून, कॅन्टोन्मेंट बोर्डचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. काही दिवसांपूर्वी या खड्डय़ांमध्ये बसविण्यात आलेले पेव्हर्सही निखळले आहेत. अवघ्या काही अंतरावर कॅन्टोन्मेंटचे कार्यालय असूनही याकडे अधिकारी दुर्लक्ष का करीत आहेत, असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
कॅन्टोन्मेंट हद्दीतील काही रस्त्यांची दुरवस्था होऊनही दुरुस्तीसाठी कोणताच प्रयत्न केला जात नाही. ग्लोब थिएटरपासून पोस्टमन सर्कलपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याचसोबत पोस्टमन सर्कलपासून रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागतात. रात्रीच्या वेळी खड्डे निदर्शनास न आल्यामुळे लहान अपघातही घडू लागले आहेत.
पोस्टमन सर्कलच्या शेजारीच मागील दोन वर्षांपासून खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी यामध्ये भरल्यानंतर ते खड्डेही निदर्शनास येत नाहीत. यामुळे अनेक वाहनचालक गंभीर जखमीही झाले आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहेत. मध्यंतरी पावसाळय़ात खड्डय़ांमध्ये पेव्हर्स घालण्यात आले होते. ते पेव्हर्सही आता निखळले असून अपघातास कारणीभूत ठरत आहेत. या मार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करत असून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी कॅन्टोन्मेंटने या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी वाहनचालक करीत
आहेत.









