प्रतिनिधी / काणकोण
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने आपल्या राज्यात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आणि गोव्यातही अंशतः लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर काणकोणच्या पोलिसांनी पोळे चेकनाक्यावरून गोव्यात प्रवेश करणाऱया सर्व वाहनांची कसून तपासणी चालू केली आहे. चेकनाक्यावरील पोलीस कर्मचारी वाहनांचे त्याचप्रमाणे चालक व इतरांचे दस्तऐवज तपासूनच वाहनांना गोव्यात प्रवेश देत आहेत.
सध्या कर्नाटक राज्यातली प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद असली, तरी मालवाहू वाहतूक काही प्रमाणात चालू आहे. मात्र या वाहनांची या चेकनाक्यावर कडक तपासणी केली जात असल्याची माहिती काणकोणचे पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली. अन्यत्र देखील विनामास्क, विनाहेल्मेट त्याचप्रमाणे विनाकारण गर्दी करणाऱयांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे सत्र काणकोणच्या पोलिसांनी सध्या सुरू केले आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार ही चिंतेची बाब असून प्रत्येक नागरिकाने स्वतः लॉकडाऊन होण्याची वेळ आता आलेली आहे. त्यामुळे काणकोणच्या जागरूक नागरिकांनी केलेल्या आवहनाला अनुसरून काणकोणच्या व्यापाऱयांनी ज्या प्रकारे स्वेच्छा आपली दुकाने बंद ठेवली त्याबद्दल नाईक यांनी त्यांचे कौतुक केले. दरम्यान, पैंगीण पंचायतीने केलेल्या आवाहनानुसार पैंगीण पंचायत क्षेत्रातील सर्व व्यवहार 6 पासून पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे. सकाळी 6 ते 9 पर्यंत केवळ जीवनावश्यक वस्तूंपुरतीच काही दुकाने उघडण्यात येतात. त्यानंतर पैंगीण बाजाराबरोबर अन्यत्र देखील शुकशुकाट पाहायला मिळत आहे.









