प्रतिनिधी /काणकोण
कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतर देखील वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱया गोमंतकीयांना आडकाठी आणण्यात येत असल्याच्या कारणावरून काणकोणच्या काँग्रेस परिवाराने पोळे चेकनाक्यावरील अधिकाऱयांना जाब विचारला. प्रदेश काँग्रेस सरचिटणीस जनार्दन भंडारी, काणकोण गट काँग्रेस अध्यक्ष प्रलय भगत व अन्य कार्यकर्त्यांनी चेकनाक्याला भेट देऊन डय़ुटीवरील कर्मचाऱयांना समज दिली. काणकोण तालुक्यातील विशेषता लोलये, पैंगीण, गावडोंगरी, खोतीगाव, चावडी परिसरांतील लोक वैद्यकीय उपचारांसाठी कारवार, माजाळी या भागांमध्ये पूर्वीपासून जात आलेले आहेत. नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा तसेच अस्थिविकारतज्ञ यासाठी या भागातील लोक मडगाव, पणजीपेक्षा कारवार पसंत करत असतात. त्याशिवाय हुळगा येथील निसर्गोपचार केंद्रात गोव्याच्या विविध भागांतील लोक गेल्या कित्येक वर्षांपासून जाऊन उपचार घेत आलेले आहेत. ज्या नागरिकांनी कोविड लसीचे दोन डोस घेतलेले आहेत त्याना चेकनाक्यावरून जायला मुभा दिलेली असताना चेकनाक्यावर या नागरिकांची अडवणूक केली जाते, परत त्यांना कोविड चाचणी करायला भाग पाडले जाते आणि त्यासाठी त्यांच्याकडून रक्कम उकळली जाते अशा तक्रारांवरून काँग्रेस परिवाराने या चेकनाक्याला भेट देऊन कर्मचाऱयांना समज दिली.









