रिजनल असिस्टंट डायरेक्टर डॉ. अनंत पाटील यांची ग्वाही : कोंबडय़ांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांचीच धडपड
प्रतिनिधी /बेळगाव
जिह्यातील पोल्ट्री फार्मस्ना अनेक समस्यांनी भेडसावून सोडले आहे. कमी होणारा दर व आजाराने मृत्यू पडणाऱया कोंबडय़ा याचबरोबर इतर समस्या निर्माण होतात. त्या सोडविण्यासाठी सारेचजण धडपड करत आहेत. मात्र यापुढे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी बेळगाव जिल्हा बॉयलर पोल्ट्री फार्मस् वेल्फेअर असोसिएशन त्यांच्या पाठिशी राहील, असे आवाहन रिजनल असिस्टंट डायरेक्टर डॉ. अनंत पाटील यांनी केले.
मच्छे येथील ब्रम्हलिंग मंदिर येथे बेळगाव जिल्हा बॉयलर पोल्ट्री फार्मस् वेल्फेअर्स असोसिएशनची बैठक पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुस्ताक सनदी होते. व्यासपीठावर विविध मान्यवर उपस्थित होते.
ढगाळ वातावरणामुळे आणि मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे अनेक पोल्ट्री फार्मस् अडचणीत आले आहेत. काहींनी तर कोरोना काळात अनेक पिल्लांना जीवंत गाढले आहे. त्यामुळे त्यांना मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली आहे. मात्र त्यांना कोणतीच आर्थिक मदत केली नाही. परिणामी याचा फटका फार्मस्ना सहन करावा लागला आहे. त्यामुळे या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. आता यापुढे कोणत्याही प्रकारचे नुकसान होवू नये व त्यासाठीचे नियोजन कोणत्या पद्धतीने करावे, यावरही या बैठकीत सविस्तर चर्चा केली.
बैठकीला डॉ. प्रताप हन्नुरकर, आर. के. पाटील, संघटनेचे अध्यक्ष नागेश कोरवी, उपाध्यक्ष नारायण नलवडे, सेपेटरी बाबू कुलम, सचिव विद्याधर कारेकर, सिकंदर सनदी यांच्यासह सर्व सदस्य, सल्लागार मंडळ, सभासद व पोल्ट्री मालक, चालक, फार्मर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









