सोनकर यांच्या अपघाती निधनाने कलप्पावाडी शोककळा
प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील कलप्पावाडीचे सुपुत्र व टेंभूर्णी ( वरवडे ) पोलीस ठाण्यात ट्राफिक हवालदार पदावर कार्यरत असलेले मल्लिकार्जुन कोंडीबा सोनकर वय ४२ यांचे दि ३० जुलै रोजी टेम्भुर्णी तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असताना टेम्पोने धक्का दिल्याने गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना सोलापूर येथील अश्विनी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जात होते.अपघाता दरम्यान त्यांच्या पायाला गंभीर जखम झाल्याने व दुखापत कमी होत नसल्याने पुढील उपचारासाठी त्यांना दि ७ ऑगस्ट रोजी पुण्यातील सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोनकर यांना वाचवण्यासाठी तेथील तज्ञ डॉक्टर व महाराष्ट्र पोलीस विभाग प्रयत्नाची पराकाष्ठा केली. पण त्यात त्यांना यश आले नाही. अखेर दि ११ रोजी सायंकाळी साडेआठ वाजता त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
यांच्या अपघाती निधनाने कलप्पावाडी गावावर शोककळा पसरली होती. संपूर्ण गाव शोकसागरात बुडून निघाला होता. दि १२ रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान सोलापूर पोलीस मुख्यालयाचे पोलीस अधिकारी व शिपाई यांच्या तर्फे शासकीय मानवंदना देऊन बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय इतमामात त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस हवालदार मल्लिकार्जुन सोनकर यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. यावेळी महामार्ग विभागाचे पोलीस अधिकारी वेळापूरे व त्यांची टीम आणि दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक छबु बेरड, पोलीस हवालदार एजाज मुल्ला, पोलीस हवालदार सुनील माने व ग्रामस्थ उपस्थित होते.









